दीपक पाटकर, अमेय देसाई यांची कार्यतत्परता पुन्हा एकदा सिद्ध !

एलआयसी ऑफिस समोरील मुख्य मार्गावर कोसळलेला माड हटवण्यासाठी मदत कार्य

वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शहरात वीज पुरवठा झाला होता खंडीत

मालवण : पावसाळा संपत आला तरी शहरातील विद्युत वाहिन्यांवरील धोकादायक झाडे हटवण्याबाबत कोणतीही कार्यवाही वीज वितरण कंपनीने केली नाही. परिणामी मंगळवारी याचा फटका शहरातील वीज ग्राहकांना बसला. बसस्थानक देऊळवाडा या मुख्य मार्गावर एलआयसी ऑफिस समोरिल मुख्य रस्त्यावर मंगळवारी माड कोसळला. सुदैवाने यावेळी मोठा अपघात टळला असला तरी परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. याची माहिती मिळताच माजी नगरसेवक दीपक पाटकर आणि युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांनी तातडीने हा माड हटवण्यासाठी मदतकार्य करत रस्ता वाहतुकीला सुरळीत केला. वाहतूक पोलीस गुरुप्रसाद परब, अनिकेत आंब्रडकर, निलेश कुडाळकर, संदीप मेस्त्री, अंतोन काळसेकर व अन्य नागरिकांनी देखील मदतकार्यात महत्वाचे योगदान दिले.

पावसाळ्यापूर्वी सतत वाहतूक असणाऱ्या शहरातील या मुख्य महामार्गावरील धोकादायक झाडे हटवावीत, याबाबत माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी वीज वितरण कार्यालय येथे निवेदन दिले होते. तसेच अमेय देसाई यांनी देखील या धोकादायक बाबीकडे निवेदन सादर करून लक्ष वेधले होते. देऊनही याबाबत कार्यवाही न झाल्याने मंगळवारी सकाळी एलआयसी ऑफिस समोरील माड वीज वाहिनीवर कोसळला. त्यामुळे प्रशासनाच्या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

माड कोसळल्याने मार्गावरील वीज वाहिन्या तुटून गेल्या. तर माड रस्त्यात पडल्याने वाहतूकही ठप्प झाली. याबाबत माहिती मिळताच माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्यासह युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई, वीज वितरण कर्मचारीही दाखल झाले. अनिकेत आंब्रडकर व सहकारी यांनी माड तोडून वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर उशिरा वीज पुरवठा सुरळीत झाला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!