धुरीवाड्यात अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; १ लाख ५६ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त!

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली कारवाई

मालवण : मालवण तालुक्यात अवैध दारू विक्रीविरोधात मालवण पोलिसांनी सध्या सातत्याने धडक कारवाया सुरू ठेवल्या आहेत. एकामागून एक छापे टाकून अवैध दारूचा साठा जप्त केला जात असल्याने अवैध दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. विशेषतः परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या कारवाई मोहिमेची परिसरात चर्चा होत आहे. शुक्रवारी (६ नोव्हेंबर) रात्री धुरीवाडा येथे पोलिसांनी छापा टाकून गोवा बनावटीची १ लाख ५६ हजार रुपये किमतीची दारू जप्त केली. या प्रकरणी दिलीप नारायण हडकर (रा. धुरीवाडा, मालवण) यांच्यावर कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक मोहन दहीकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांनी या कारवाईचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली हेड कॉन्स्टेबल सुहास पांचाळ, हेड कॉन्स्टेबल सुप्रिया पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल सुमिता चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, दीपक शेलार यांनी मालवणमधील अवैध दारू व्यवसायाविरोधात कारवाईचा वेग कायम ठेवला आहे. केवळ एखाद्या कारवाईपुरते मर्यादित न राहता सातत्याने छापे टाकण्यावर भर दिला जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या या सक्रिय भूमिकेमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये कारवाईची धास्ती निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!