मालवण शहरात ‘आंधळं दळतय, कुत्रं पीठ खातयं’ अशी महावितरणची अवस्था…

एका ठिकाणी विद्युत पोल कोसळण्याच्या स्थितीत तर दुसरीकडे डीपी बॉक्सच्या पेट्या उघड्या 

शहरात दुर्घटना घडून कोणाचा जीव गेल्यास जबाबदार अधिकाऱ्यांना खुर्चीत बसू देणार नाही : ठाकरे शिवसेनेच्या बाबी जोगी यांचा इशारा 

मालवण : शहरातील धुरीवाडा प्रभाग क्रमांक १ मधील सायबा हॉटेलनजीक असलेला एक विद्युत पोल गेल्या कित्येक दिवसांपासून पूर्णपणे बेंड होऊन उभा आहे. हा पोल कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते, मात्र याकडे प्रशासनाने पूर्णपणे डोळेझाक केली आहे. तसेच चिवला बीच येथे समुद्राच्या बाजूला महावितरणने बसवलेल्या डीपी बॉक्स पेट्या पूर्णपणे उघड्या अवस्थेत आहेत. शहरातील महावितरण व्यवस्थेची दुरवस्था पाहता प्रशासन शहरात एखादा मोठा अपघात घडण्याचीच वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी केला आहे. 

मालवण शहरात सध्या ‘आंधळं दळतय, कुत्रं पीठ खातयं’ अशी महावितरणच्या कारभाराची अवस्था झाली असून निष्पाप जनतेच्या जिवाची अधिकाऱ्यांना काळजी राहिलेली नसून मालवण शहरात महावितरणच्या निष्काळजीपणामुळे जर एखादा अपघात घडला किंवा कोणाचा जीव गेला, तर संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना खुर्चीत बसू देणार नाही, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी दिला आहे.

पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. समुद्राकाठच्या या उघड्या वीज पेट्यांमध्ये सोसाट्याचा वारा आणि पावसाचे पाणी थेट आत शिरणार आहे. यामुळे संपूर्ण परिसरात शॉर्ट सर्किट होऊन मोठा अनर्थ घडण्याची दाट शक्यता आहे. याचा थेट फटका स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना बसणार आहे. अधिकारी सध्या सांगत आहेत की ‘पावसाळ्यापूर्वीची कामे’ सुरू आहेत, पण प्रत्यक्षात हीच का तुमची कामे? असा सवाल त्यांनी केला. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे मालवणात ‘स्मार्ट मीटर’ कसे बसवता येतील, यासाठीच सर्व अधिकारी रात्रीचा दिवस करून प्रयत्न करत आहेत. मात्र, ज्या मूलभूत सुविधा आणि सुरक्षा पुरवणे गरजेचे आहे, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. हे मालवणकरांचे मोठे दुर्दैव आहे,” अशी खंत जोगी यांनी व्यक्त केली. 

error: Content is protected !!