मोठा गाजावाजा करून खरेदी केलेले फायरबॉल प्रदर्शनात ठेवलेत काय ? राजन वराडकर यांचा सवाल

“त्या” आगीवेळी फायर बॉलचा वापर का केला नाही ? ते सुद्धा कुचकामी आहेत का तुमच्यासारखे ??

कुणाल मांजरेकर

मालवण : दांडी येथील मच्छिमारी साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला मंगळवारी लागलेल्या आगीवरून उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे. नगराध्यक्षांनी मोठा गाजावाजा करून फायरबॉल खरेदी केले आहेत. मात्र हे फायरबॉल आगीवेळी का वापरले नाहीत ? मोठा गाजावाजा करून खरेदी केलेले फायरबॉल प्रदर्शनात ठेवलेत काय ? की ते फायरबॉल देखील तुमच्या सारखे कुचकामी ठरलेत का ? असा जळजळीत सवाल राजन वराडकर यांनी प्रसिध्दीपत्रकातून केला आहे.
या आगीवरून त्यांनी मुख्याधिकाऱ्यांवर देखील टीका केली आहे. शहरात लागलेल्या आगीच्या नुकसानीची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांनी स्वीकारून त्याची तात्काळ भरपाई स्वतः द्यावी अन्यथा मालवण नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही श्री. वराडकर यांनी केली आहे. मंगळवारी सकाळी दांडी येथील मच्छीव्यावसायिक बाबला पिंटो यांच्या गोडाऊनला आग लागली आणि मच्छीजाळी व इतर साहित्य जळून सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. नगरपरिषदेकडे अग्निशमन बंब नसल्यामुळे आणि नगरपालिकेने खरेदी केलेले फायर बॉल वेळेत न पोचू शकल्यामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले. स्थानिकांनी मदतकार्य केल्यामुळे आणि प्रसंगावधान पाळल्यामुळे आगीवर नियंत्रण आणता आले. सर्व झाल्यावर नगरपरिषद कर्मचारी पोचले. त्यानंतर नगराध्यक्ष पाहणी करायला गेलेत. या नुकसानीला जबाबदार कोण? सगळ्या गोष्टी जनतेनेच करायच्या असतील तर तुम्ही नक्की काय करणार आहात ? यापूर्वी वादळात जनतेनेच तुमची लाज राखली. मग तुम्ही सत्ताधारी म्हणून मिरवता ते काय फक्त फोटोसेशन करण्यासाठी का ? आज त्या फायरबॉल चा वापर का केला नाही? का ते सुद्धा कुचकामी आहेत तुमच्यासारखे ? असा सवाल राजन वराडकर यांनी केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!