मालवणात संजय गांधी निराधार योजनेच्या विशेष महाशिबिराला “महाप्रतिसाद”

३२१ जणांना ऑन दी स्पॉट लाभ ; आ. वैभव नाईकांनी भेट देऊन आयोजनाचे केले कौतुक

महसूल प्रशासन, समिती अध्यक्ष मंदार केणी यांच्यासह समिती सदस्य आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे परिश्रम

कुणाल मांजरेकर

मालवण : संजय गांधी निराधार योजनेसाठी कागदपत्रे जमवताना लाभार्थ्यांची हॊणारी अडचण विचारात घेऊन संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष मंदार केणी, तहसीलदार अजय पाटणे यांच्या संकल्पनेतून येथील मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या विशेष महाशिबीराला गावागावांतील लाभार्थ्यांचा “महाप्रतिसाद” मिळाला. या शिबिरात १५३ उत्पनाचे दाखले, ९५ हयातीचे दाखले ऑन दी स्पॉट देण्यात आले. तर संजय गांधी निराधार योजनेची नवीन ७० प्रकरणे एकाच वेळी दाखल करून घेण्यात आली. या शिबिराला आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले. महसूल प्रशासनाने याच धर्तीवर रेशन कार्डातील दुरुस्तीसाठी शिबिर आयोजित करावे, अशी सूचना आ. नाईक यांनी महसूल प्रशासनाला यावेळी केली आहे.

संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष मंदार केणी यांचा सत्कार करताना तहसीलदार अजय पाटणे सोबत आमदार वैभव नाईक, हरी खोबरेकर, महेश जावकर, अरविंद मोंडकर व अन्य

महसूल विभाग, वन विभाग आणि मालवण तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मामा वरेरकर नाट्यगृहात संजय गांधी निराधार योजना शिबिर पार पडले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून गरजू व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराला आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन या शिबिर आयोजनाचे कौतुक केले. संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी हे समजात शेवटच्या स्तरावर असतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करताना त्यांना तहसील कार्यालयात अनेक फेऱ्या माराव्या लागतात. मात्र आजच्या शिबिरामुळे या प्रक्रियेत सुसूत्रता येऊन लाभार्थ्यांचा आणि अधिकारी, कर्मचारी यांचाही वेळ वाचला आहे. असे शिबीर यापुढेही आयोजित करण्यात यावे. तसेच रेशन कार्ड बाबतही शिबिराचे आयोजन करण्यात यावे, असे यावेळी आ. वैभव नाईक यांनी सांगितले.

संजय गांधी निराधार अनुदान योजेनेच्या महाशिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तहसीलदार अजय पाटणे, समितीचे अध्यक्ष मंदार केणी यांनी स्वतः जातिनिशी उपस्थित राहून सहकार्य केले.

यावेळी तहसीलदार पाटणे, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष मंदार केणी यांनीही मनोगत व्यक्त केले. या शिबीरात नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, उदय मोंडकर यांच्यासह २७ तलाठी, ७ मंडळ अधिकारी आणि तहसील कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन नागरिकांचे अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही केली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, महेश जावकर, बाबी जोगी, शीला गिरकर, संमेश परब, उमेश मांजरेकर, नरेश हुले, प्रमोद कांडरकर, पंकज सादये, अरविंद मोंडकर, मंदार ओरसकर, प्रसाद आडवणकर, उदय दुखंडे, यशवंत गावकर, अनुष्का गावकर, सुनील पाताडे आदी व इतर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!