मासेमारी बंदी कालावधी वाढल्याने परराज्यातील ट्रॉलर्सकडून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ‘मासळीची लूट’ होणार ?

ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी व्यक्त केली भीती : परराज्यातील ट्रॉलर्सना पायबंद घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार ?

मालवण : राज्यात मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला असला, तरी शेजारील राज्यांमध्ये ही बंदी ३० जुलैलाच संपत आहे. या विसंगतीमुळे बंदीच्या वाढीव कालावधीत शेजारच्या राज्यांतील ट्रॉलर्सधारक महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसून मासळीची लूट करण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, परराज्यातील ट्रॉलर्सना रोखण्यासाठी आणि आपल्या मच्छिमारांचे नुकसान टाळण्यासाठी शासन काय पायबंद घालणार? असा सवाल ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी उपस्थित केला आहे.

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंतच होता. मात्र, शेजारील राज्यांशी सुसंगतता राखण्यासाठी आणि स्थानिक मच्छिमारांचे नुकसान टाळण्यासाठी हा कालावधी नंतर ३० जुलैपर्यंत करण्यात आला होता. आता शासनाने पुन्हा नव्याने हा बंदी कालावधी वाढवून तो १५ ऑगस्ट केला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील मच्छिमारांच्या नौका बंदरावर उभ्या राहतील, पण दुसरीकडे लगतच्या अन्य काही राज्यांमधील मासेमारी बंदी ३० जुलैलाच संपणार आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासूनच या राज्यांतील शेकडो ट्रॉलर्स महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मासळीची लूट करण्यासाठी सज्ज होतील, अशी भीती खोबरेकर यांनी व्यक्त केली आहे.

जर महाराष्ट्र राज्याची किनारपट्टी आणि येथील हक्काची मासळी लगतच्या अन्य राज्यांतील ट्रॉलर्सना एकप्रकारे आंदणच दिली जाणार असेल, तर या निर्णयाचा फायदा काय? आपल्या राज्यातील मच्छिमारांचे हित राखण्यासाठी, लगतच्या राज्यांमध्येही मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री केंद्रीय पातळीवर किंवा संबंधित राज्यांशी चर्चा करून प्रयत्न करणार आहेत का? असा प्रश्न श्री. खोबरेकर यांनी उपस्थित केला आहे. वाढीव १५ दिवसांच्या काळात परराज्यातील यांत्रिक नौका आणि हायस्पीड ट्रॉलर्सना महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत येण्यापासून रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग आणि सागरी पोलीस काय कडक पावले उचलणार, याकडे आता संपूर्ण किनारपट्टीवरील मच्छिमारांचे लक्ष लागले आहे. शासनाने यावर तातडीने ठोस उपाययोजना जाहीर करावी, अशी मागणीही श्री. खोबरेकर यांनी केली आहे.

error: Content is protected !!