संघटन बळकटीसाठी गावागावात उतरा; जनतेशी नाळ घट्ट करा…

लांजा-राजापूर विधानसभा चिंतन बैठकीत आमदार प्रमोद जठार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन; रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

कासार्डे : आगामी काळातील संघटनात्मक आव्हाने आणि पक्षाचा जनाधार अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चिंतन बैठक कासार्डे येथील अभिषेक मंगल कार्यालयात आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडली.

बैठकीच्या प्रारंभी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून अभिष्टचिंतन करण्यात आले. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रवींद्र चव्हाण यांना शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्याची व उत्तम आरोग्याची कामना केली.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रमोद जठार यांनी “संघटनाची खरी ताकद तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आहे,” असे स्पष्ट करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावागावात सक्रिय होण्याचे आवाहन केले. जनतेशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घ्या, नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घ्या आणि पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबवा, असे त्यांनी सांगितले.

केवळ बैठका आणि कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता प्रत्येक बूथ, प्रत्येक गाव आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत पक्षाचा कार्यकर्ता पोहोचला पाहिजे, यावर जठार यांनी भर दिला. तळागाळातील कार्यकर्त्यांचे जाळे अधिक सक्षम करून संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदारीने आणि सक्रियपणे काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

बैठकीत आगामी काळातील संघटनात्मक कार्यक्रम, जनसंपर्क अभियान, सामाजिक उपक्रम तसेच पक्षाची कार्यपद्धती अधिक प्रभावी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांमध्येही यावेळी उत्साहाचे वातावरण दिसून आले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा सरचिटणीस अभिजित गुरव, राजापूर मंडल अध्यक्ष ॲड. एकनाथ मोंडे, मोहन घुमे, रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संदीप नाचणकर, चंद्रकांत मांडवकर, शिल्पा मराठे, श्रुती ताम्हणकर, अमित केतकर, संजय यादव, सुरेश गुरव, शैलेश खामकर, प्रथमेश बेंडल, अमोल कानडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या माध्यमातून गावागावात संघटन विस्तार, जनतेशी थेट संपर्क आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

error: Content is protected !!