शिस्तप्रिय शिक्षक, उत्तम प्रशासक म्हणून संजय जोशींचे कार्य उल्लेखनीय : दिगंबर सामंत
टोपीवालाचे माजी मुख्याध्यापक जोशी सरांचा प्रशालेत निरोप समारंभ संपन्न
कुणाल मांजरेकर
मालवण : टोपीवाला हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक संजय जोशी यांनी शिस्तप्रिय शिक्षक आणि उत्तम शालेय प्रशासक अशा भूमिका सुयोग्य पद्धतीने वठवल्या. टोपीवाला हायस्कूल येथे शिक्षकी सेवा देताना संस्था पदाधिकारी, सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या बरोबरच समाजात एक वेगळे स्थान त्यांनी निर्माण केले होते. त्यामुळे संजय जोशी यांचे गुण शिक्षकांनी आत्मसाद करावेत, असे प्रतिपादन मालवण एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष दिगंबर सामंत यांनी संजय जोशी यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभाप्रसंगी बोलताना केले.
टोपीवाला हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक संजय जोशी यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ शनिवारी टोपीवाला हायस्कूल येथे संपन्न झाला. याप्रसंगी श्री. सामंत हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव विजय कामत, संजय जोशी, सौ. मेघना जोशी, मुख्याध्यापक दत्तप्रसाद खानोलकर, पर्यवेक्षक सुभाष प्रभुखानोलकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्याध्यापक श्री. खानोलकर म्हणाले, संजय जोशी यांच्यात आदर्श शिक्षकाचे सर्वगुण होते. त्यामुळे आपल्याला त्यांच्या सानिध्यात राहून जे गुण प्राप्त झाले, त्याचे आपण अनुकरण करणार का ? याचे आत्मपरीक्षण प्रत्येक शिक्षकाने करावे. जोशी सरांसारखे प्रत्येकाने वागण्याचा प्रयत्न केला तर टोपीवाला हायस्कूल निश्चितच आणखी वेगाने प्रगती करेल, असे सांगून जोशी सर यांच्या काळातील आठवणी अविस्मरणीय आहेत. त्यांच्यातील चांगले गुण प्रत्येकाने आत्मसाद केले तर शाळेचा आणि विद्यार्थ्यांचा देखील विकास होईल, असे ते म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना संजय जोशी म्हणाले, “जे जे आपणासी ठावे ते दुसऱ्यासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जनासी” या उक्तीप्रमाणे टोपीवाला हायस्कूल येथे आपण अध्यापनाचे काम केले. आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग टोपीवाला हायस्कूल परिसरातील प्रत्येक घटकासाठी व्हावा, यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलो. टोपीवाला हायस्कूल येथे ३३ वर्षाची सेवा बजावताना संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी, मित्र परिवार यांचे मोलाचे सहकार्य मिळाले, असे ते म्हणाले.
यावेळी पर्यवेक्षक सुभाष प्रभुखानोलकर, देविदास वेरलकर, चंद्रशेखर बर्वे, सुनिल काळसेकर, विजय गोसावी, श्रावण गवळी, रामदास मणेरीकर, सुप्रिया आचरेकर, दर्शना सामंत, तेजल वेंगुर्लेकर, श्रीमती नंदिनी सुतार यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेश धामापूरकर यानी केले. तर पर्यवेक्षक सुभाष प्रभुखानोलकर यांनी आभार मानले.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष दिगंबर सामंत यांच्या हस्ते संजय जोशी यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच टोपीवाला हायस्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, टोपीवाला हायस्कूल ग्राहक भांडार यांच्यावतीने देखील त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संजय जोशी यांच्या पत्नी लेखिका मेघना जोशी यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी संजय जोशी यांनी संस्थेच्या टोपीवाला हायस्कूल, टोपीवाला प्राथमिक शाळा, जय गणेश इंग्लिश मिडीयम या शाळाना भारतीय संविधानाची प्रास्ताविकाभेट म्हणून दिली. तसेच काळे आजींची बालवाडी व जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल प्रशालेच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही केले.