दत्ता सामंत, संजय आग्रे यांनी कुडाळ, मालवणात घेतला मतदानाचा आढावा
निलेश राणेंचा विजय मोठ्या मताधिक्याने निश्चित : दत्ता सामंत यांनी व्यक्त केला विश्वास
जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघात महायुतीचे उमेदवार विजयी होणार
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे यांनी बुधवारी कुडाळ, मालवण तालुक्यात मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. मतदार संघात महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून मोठ्या मताधिक्याने निलेश राणे यांचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया दत्ता सामंत यांनी व्यक्त केला. दरम्यान, शिवसेना – भाजपा महायुतीला जिल्ह्यात पोषक वातावरण असून जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघात महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास देखील दत्ता सामंत यांनी व्यक्त केला आहे.
कुडाळ मालवण मतदार संघात निलेश राणे यांचा विजय नक्कीच आगळा वेगळा असेल. वाढलेले मतदान वैभव नाईक यांच्या अपयशी कारभाराला धक्का देणारे असून निलेश राणे यांचा विजय मोठ्या मताधिक्याने निश्चित झाला आहे. दहा वर्षात वैभव नाईक यांनी काहीच केले नाही. उलट निलेश राणे गेली चार पाच वर्षे सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून काम करत होते. मोठा विकासनिधी त्यांनी आणला. महायुती सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घरोघर प्रचार केला. जोमाने काम केले. जनतेने उत्स्फूर्त मतदान केले. मतदान वाढले. हे वैभव नाईक यांना धक्का देणारे ठरणार आहे. त्यामुळे निलेश राणे यांचा विजय निश्चित झाला आहे. खा. नारायण राणे यांच्या मार्गदर्शनात हा मतदारसंघ निलेश राणे वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार यात शंका नाही, असा विश्वास दत्ता सामंत यांनी व्यक्त केला आहे.
कणकवली मतदार संघात महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांची निवडणूक एकतर्फीच झाली असून त्यांना सक्षम प्रतिस्पर्धी नसल्याने ते विजयाची हॅट्ट्रिक करणार यामध्ये तिळमात्र शंका नाही. तर सावंतवाडी मध्ये मंत्री दीपक केसरकर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. स्थानिक नेतृत्व म्हणून त्यांना मतदारांची पसंती असून जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघात महायुती विजयी होणार, असे दत्ता सामंत म्हणाले.