राजकोट पुतळा दुर्घटना : मुंबई उच्च न्यायालयाकडून चेतन पाटीलला जामीन मंजूर
मालवण : येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटने प्रकरणी जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना अटक करण्यात आली होती. या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील चेतन पाटील याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मालवण परिसरातील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ आठ महिन्यात कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यामध्ये चेतन पाटीलला दिलासा देत न्यायालयाने त्याला २५ हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.