एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन महायुतीचे जिल्ह्यातील तिन्ही उमेदवार विजयी होणार

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा विश्वास ; भाजपाच्या ‘मेरा बुथ सबसे मजबूत’ चा होणार मोठा फायदा

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातून एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन महायुतीचे उमेदवार निलेश राणे, नितेश राणे, दीपक केसरकर विजयी होतील, असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार असून महायुती सरकारमध्ये जिल्ह्याला चांगले प्रतिनिधित्व मिळेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

मालवण तालुक्यात मतदानाचा आढावा घेत असता भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी बुथवर भेट देत पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. सावंत म्हणाले, ‘मेरा बुथ सबसे मजबूत’ या धोरणातून भाजपा काम करत असताना बूथवर लक्ष देऊन काम करण्यात आले. त्याचा फायदा प्रत्येक ठिकाणी झाला. जास्त मतदान मालवण मतदारसंघात झाले. महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना प्रचारात मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद तसेच झालेले जास्तीचे मतदान पाहता निलेश राणे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. संघटना म्हणून झालेले चांगले काम, सरकार म्हणून असलेले चांगले काम, उमेदवार यांचा मतदारसंघात असलेला संपर्क हे सगळे जुळून आले. सोबत आमचे नेते खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनात अनेक विकासकामे झाली. त्याचाही मोठा फायदा झाला. जिल्ह्यात महायुती तीनही उमेदवार एक लाख पेक्षा जास्त मताधिक्य घेऊन विजयी होणार असा विश्वास प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3835

Leave a Reply

error: Content is protected !!