शांतताप्रिय सावंतवाडी मतदार संघ तसाच राहिला पाहिजे यासाठी माझे प्रयत्न
सावंतवाडीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया
शेतकऱ्यांना फसवणारी प्रवृत्ती गावात आल्यास जनतेने हाकलून लावावे
सावंतवाडी | सिद्धेश पुरळकर
माझा सावंतवाडी मतदारसंघ शांतताप्रिय मतदारसंघ आहे. तो तसाच राहिला पाहिजे यासाठी माझे प्रयत्न आहेत. माझा संघर्ष हा यापुर्वी अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला आहे. आता माझा संघर्ष हा शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांना अपप्रवृत्ती विरोधात असून अशा अपप्रवृत्ती गावात आल्यास त्याला जनतेने हाकलून लावावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जनतेला केले आहे. ना. केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब, महिला जिल्हा संघटक निता कविटकर, सावंतवाडी शहर प्रमुख बाबू कुडतरकर आदी उपस्थित होते. ना. केसरकर म्हणाले, राज्याचा शालेय शिक्षण मंत्री म्हणून आपण शिक्षण क्षेत्रात वेगळी क्रांती घडवून आणली आहे. राज्यात एक गणवेश केला आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. मंत्री पदाची मोठी जबाबदारी आपल्यावर असल्याने मतदारसंघात येता आले नाही याचे दुःख मला आहे. मध्ये मध्ये येऊन जनतेला भेटावे अशी त्यांची इच्छा असते. मात्र यापुढे हे प्रेम त्यांना दिले जाईल. माझी कायम आमदार व्हावे अशी इच्छा नाही. परंतु मी जे स्वप्न जनतेला मी दाखवले आहे, मंजूर केलेली विकास कामे अपूर्ण आहेत, ती पूर्ण करण्यासाठी तसेच ज्याप्रमाणे मुंबई मध्ये अमुलाग्र बदल घडवून आणला तो बदल मला जिल्ह्यात घडवून आणायचा असल्याने आपण पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहे, असे ते म्हणाले.
खासदार नारायण राणे माझ्यासोबत असल्याने तसेच पालकमंत्र्यांचा आशीर्वाद असल्याने मला कशाचीही भीती नाही. मला निवडून आणण्यामध्ये मोठे श्रेय खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आहे. मी मतदार संघाचा जो कायापालट केला तो मतदारसंघात फिरल्यावरच दिसेल. जो मतदारसंघात फिरत नाही, त्याला विकास कसा दिसणार असा सवाल केसरकर यांनी विरोधकांना केला. मी मराठी भाषा सातासमुद्रापार पोचवली. मला मराठी माणसांचा अभिमान आहे म्हणून हे केले असे केसरकर म्हणाले.