भाजपा युवा मोर्चाचा कार्यकर्ता हा पक्षाची ढाल आणि तलवार
आमदार नितेश राणे यांचे “आयडीयाज फॉर विकसित महाराष्ट्र” कार्यक्रमात उद्गार ; भाजयुमोच्या कणकवलीतील मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
महायुतीच्या यशात भाजप युवा मोर्चाचा सिंहाचा वाटा असेल असे काम करा : प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचे आवाहन
कणकवली : समाजात वावरत असताना भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याचे अस्तित्व दिसले पाहिजे. त्याची दखल घेतली जाईल, त्याचे वेगळेपण मोजले जाईल असे चांगले काम समाजात करा. युवा मोर्चाचा कार्यकर्ता हा पक्षाची ढाल आणि तलवार आहे. त्यामुळे तो २४ तास जनतेचा सेवक आहे. जनता आणि कार्यकर्ता यांच्यातील दरी कमी करून कामाला लागा, असे आवाहन भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केले.
“आयडीयाज फॉर विकसित महाराष्ट्र” या युवा मोर्चाच्या प्रहार भवन येथील कार्यक्रमात आमदार नितेश राणे बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे यांनी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करताना समाज कार्यासाठी कटीबद्ध होण्याचे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा उपाध्यक्ष लखमराजे भोसले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, सिंधुदुर्ग प्रभारी स्वप्निल काळे – पाटील, सहप्रभारी अक्षय पाठक, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संतोष पुजारे, विजय इंगळे, प्रज्वल वर्दम आदी उपस्थित होते.
यावेळी आ. राणे म्हणाले, बैठकीला युवकांची उपस्थितांची पाहून विश्वास वाढला. समाधान वाटले. युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांचे अभिनंदन केले पाहिजे असे काम ते करत आहेत. युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गावागावात, तळागाळात पोहोचले पाहिजे. राजकारण व समाजकारण हे नोकरी सारखे आठ तास काम केले असे नाही, तर जनतेच्या सेवेसाठी सतत तत्पर राहिले पाहिजे. सोयीप्रमाणे न राहता आपण २४ तास जनते सोबत राहिल पाहिजे. लोकांमध्ये मिळून मिसळून राहिलं पाहिजे.२४ तास आपण जनतेचे सेवक आहोत हे समजून काम केल्यास जेव्हा जेव्हा जनतेकडे आशीर्वाद मागाल तेव्हा ते नक्कीच आपल्याला भेटणार आहेत.असे त्यांनी सांगितले. सोशल मीडियाची टीम भक्कम असली पाहिजे. पक्षाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिम्मत होता नये. आपल्या नेत्यांवर कोणी बोललं की त्याला अंगावर कोणी घेतच नाही असे होता नये. जशास तसे उत्तर देण्याची तयारी युवा कार्यकर्त्यांची असली पाहिजे.आपल्या नेत्याची अस्मिता आपणच जपली पाहिजे. युवा मोर्चात सर्व प्रकारचे कार्यकर्ते असले पाहिजेत. कारण समाजात सर्व शत्रू असतात, मात्र त्यांना जिंकले पाहिजे. पुन्हा सरकार आणायचं असेल तर युवा मोर्चाला मेहनत घ्यावी लागते. आपल्याकडे यावर्षी नवीन मतदारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी आहे. नवीन मतदारांची बैठक घेतली पाहिजे. युवा मोर्चा प्रमाणे युवती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सक्रिय करा.आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात ६५% टक्के महिलांची संख्या आहे. त्या दृष्टीने युवा मोर्चाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले. युवा मोर्चा प्रदेश आध्यक्ष अनुप मोरे यांचा प्रवास खडतर असून त्यांचा हा प्रवास मी अत्यंत जवळून पाहिला, अनुभवला आहे. तळागाळात काम करून ते मोठे झालेत. असं नेतृत्व आपल्याला युवा मोर्चाला लाभले आहे, याबद्दल आमदार नितेश राणे यांनी समाधान व्यक्त केले.
महायुतीच्या विजयासाठी युवा मोर्चाने नियोजन बद्ध काम करावे : अनुप मोरे
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रत्येक उमेदवार प्रचंड मतानी निवडून आला पाहिजे. यासाठी युवा मोर्चाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करा आणि या निवडणुकीमधील यशात सिंहाचा वाटा उचला असे आवाहन भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी केले.