दत्ता सामंत यांच्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन : कुडाळ आणि कणकवली मतदार संघाची जबाबदारी
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेनेत प्रवेश केलेल्या दत्ता सामंत यांच्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र प्रदान केले आहे. दत्ता सामंत यांच्यावर कुडाळ आणि कणकवली मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे.
वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना पक्षाच्या कुडाळ व कणकवली विधानसभा मतदार संघाच्या जिल्हाप्रमुख पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल, तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास त्यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात व्यक्त करण्यात आला आहे. हे नियुक्तीपत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी दत्ता सामंत यांना सुपूर्द केले. यावेळी आ. रवींद्र फाटक, संजय आग्रे आदी उपस्थित होते.