पत्नीला घटस्फोट देत नसल्याच्या रागातून मारहाण प्रकरणी तीन आरोपीना ३ महिन्यांचा साधा कारावास

धुरीवाडा येथील घटना ; आरोपीना मालवणचे मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमरदीप तिडके यांनी सुनावली शिक्षा ; सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता तुषार भणगे यांचा युक्तिवाद

मालवण | कुणाल मांजरेकर

पत्नीला घटस्फोट देण्यास नकार देत असल्याच्या रागातून शहरातील धुरीवाडा येथील मंगेश गुरुनाथ गोवेकर यांना धुरीवाडा कन्याशाळेसमोर हाताच्या थापटानी आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करून प्लास्टिकची खुर्ची मारून दुखापत केल्या प्रकरणी तीन आरोपीना तीन महिन्यांच्या साध्या कारवासाची शिक्षा मालवणचे मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमरदीप तिडके यांनी सुनावली आहे. ही मारहाणीची घटना ३ जुन २०१८ रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली होती. आरोपींमध्ये वैभव भरत नागवेकर (राहणार वायरी भूतनाथ मालवण), हर्षल रवींद्र पराडकर (राहणार सर्जेकोट मालवण) आणि निलेश रमेश आडकर (राहणार सर्जेकोट मालवण) यांचा समावेश आहे. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता तुषार भणगे यांनी काम पाहिले.

या गुन्ह्यातील फिर्यादी मंगेश गुरुनाथ गोवेकर (रा.धूरीवाडा) यांनी 16 ऑक्टोबर 2016 रोजी एका महिलेशी धार्मिक पद्धतीने लग्न केलेले होते. लग्नानंतर दोघेही एकत्र कुटुंबात राहिले. त्या नंतर फिर्यादी यांची पत्नी हिला फिर्यादी सोबत राहायचे नसल्याने ती आपले माहेरी राहायला गेली व ती फिर्यादी यांचेकडे घटस्फोटाची मागणी करू लागली. परंतु घटस्फोट देण्यास फिर्यादी यांनी नकार दिला. फिर्यादी यांचे पत्नीचे माहेरचे लोक फिर्यादी यांनी आपले पत्नीला तात्काळ घटस्फोट देण्यासाठी फिर्यादी यांचेवर दबाव आणत होते. 3 जुन 2018 रोजी सायंकाळी 16.30 वाजताच्या दरम्यान फिर्यादी हे धुरीवाडा कन्याशाळे समोर विनोद कांबळी यांच्या सर्व्हिसिंग सेंटर बसलेले असताना यातील आरोपी क्र.१) वैभव भरत नागवेकर,राहणार वायरी भूतनाथ मालवण २)हर्षल रवींद्र पराडकर राहणार सर्जेकोट मालवण ३) तुषार मारुती सावजी राहणार सर्जेकोट मालवण ४) निलेश रमेश आडकर राहणार सर्जेकोट मालवण हे त्या ठिकाणी आले. व त्यांनी फिर्यादी यांना तू तुझ्या पत्नीला घटस्फोट का देत नाहीस ? असे म्हणून हाताचे थापटानी व लाथा बुक्क्यांनी मारून खाली जमिनीवर पाडले व आरोपी क्र १ यांनी तिथे असलेली प्लॅस्टिकची खुर्ची फिर्यादी यांचे पाठीवर मारली व आरोपी क्र १ ते ४ यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. याबाबत मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी क्र.३ हा मयत झाल्याने न्यायालयात आरोपी क्र.१,२, व ४ विरुध्द खटला चालवण्यात आला. आरोपी क्र.१,२, व ४ यास मां. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमरदीप डी. तिडके मालवण यांनी भा. द. वि.कलम 323 मध्ये दोषी ठरवून 03 महिना साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. सदर गुन्ह्यातील साक्षीदार यांना पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अमलदार यांनी उत्तम रित्या ब्रिफींग केले होते. तपास पो.हे. कॉ. गलोले यांनी केला होता. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता म्हणून तुषार भणगे यांनी काम पाहिले. तसेच कोर्ट पैरवी पो. कॉ. करंगुटकर यांनी काम पाहिले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!