महावितरणच्या “महादादागिरी” वर भाजप आक्रमक ; निलेश राणेंनीही भरला दम !

सक्तीची वसुली थांबवा, नाहीतर १५ दिवसांत वीज वितरणवर धडक मोर्चा आणणार : सुदेश आचरेकर यांचा इशारा

महावितरणकडून थकीत बिलांवर सावकारी व्याज ; विजय केनवडेकर यांची नाराजी

कंत्राटी कामगारांना वीज बील वसूलीसाठी पाठवू नका ; संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांची मागणी

कुणाल मांजरेकर

मालवण : महावितरण कंपनीने थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी ग्राहकांवर “महादादागिरी” सुरू केली आहे. वीज बिलांची थकीत रक्कम तात्काळ भरणा न करणाऱ्या ग्राहकांची वीज कनेक्शन तात्काळ तोडण्याची धमकी दिली जात आहे. महावितरणच्या या महादादागिरी विरोधात भाजपाने बुधवारी आक्रमक पवित्रा घेतला. जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर धडक मारून महावितरणच्या अधिकाऱ्यांना या वसुली मोहिमेबाबत जाब विचारला. दरम्यान भाजपा नेते निलेश राणे यांनीही दूरध्वनीवरून बोलताना महावितरणने ही दादागिरी तात्काळ थांबवावी. अन्यथा त्यानंतर होणाऱ्या परिणामास तुम्ही स्वतः जबाबदार राहाल असा गर्भित इशारा दिला आहे. तर ग्राहकांकडून दोन ते तीन टप्प्यात वीज बिले भरून घ्यावीत, तसेच ग्राहकांवर दादागिरी करू नये, अन्यथा येत्या पंधरा दिवसात शहर आणि तालुका भाजपाच्या वतीने महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी दिला आहे. महावितरणकडून थकीत वीज बीलांवर सावकारी पद्धतीने व्याज आकारणी केली जात आहे. याबाबत प्रभारी अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी नाराजी व्यक्त केली. तर महावितरणने वीज बिल वसूलीसाठी कंत्राटी कामगारांना पाठवू नये, अशी मागणी कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी दिली आहे.

गणेश चतुर्थी कालावधीत बंद असलेली वीज बिल वसुली मोहीम महावितरण कंपनीने अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापासून हाती घेतली आहे. मात्र यावेळी सर्वच्या सर्व रक्कम तात्काळ भरण्याची सूचना करून पार्ट पेमेंट न स्वीकारण्याची भूमिका घेत संपूर्ण रक्कम न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्याची धमकी दिली जात असल्याने महावितरणची ही “महादादागिरी” वादग्रस्त ठरली आहे. या विरोधात भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयावर धडक मारून जाब विचारला. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, बाबा परब, महेश मांजरेकर, नगरसेवक आप्पा लुडबे, माजी सभापती अनिल कांदळकर आदी उपस्थित होते.

वीज ग्राहक ५० % रक्कम भरायला तयार आहेत. असे असताना वीज वितरणचे कर्मचारी सर्व रक्कम तात्काळ भरणा करण्याची सूचना करीत आहेत. ही रक्कम न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्याची भाषा वापरली जात आहे. ही दादागिरी कशासाठी ? लॉकडाऊन जनतेने नाही, सरकारने केले होते. त्यावेळी तुमच्या मंत्र्यांनी वीज बील माफ करण्याची ग्वाही दिली होती. तसेच लॉकडाऊन मुळे जनतेची उपासमार सुरू आहे. हॉटेल व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे ही बिले प्रलंबित राहिली असून महावितरणने ही बिले वसूल करण्यासाठी योग्य मार्ग निवडावा आणि ग्राहकांशी चांगली भाषा वापरावी, असे अशोक सावंत म्हणाले. तर वीज वितरण कंपनी मार्फत थकीत वीज बील ग्राहकांवर चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी सुरू असून याबाबत विजय केनवडेकर यांनी नाराजी व्यक्त केली. एकीकडे शासन सावकारी पद्धत बंद करण्यासाठी प्रयत्न करत असताना महावितरण कंपनी स्वतः सावकारी व्यवसाय करीत असून चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी बंद करावी, अशी मागणी श्री. केनवडेकर यांनी केली.

महावितरणला १५ दिवसांची डेडलाईन

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी महावितरण कंपनीला १५ दिवसांची डेडलाईन दिली आहे. थकीत ग्राहकांची वीज जोडणी रद्द करण्याचे दिलेले आदेश तात्काळ रद्द करावेत. ग्राहकांना तीन टप्प्यात वीज बिल भरण्यासाठी सवलत द्यावी, असे सांगून १५ दिवसांत याची कार्यवाही न झाल्यास महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा सुदेश आचरेकर यांनी दिला आहे.

वसुलीसाठी कंत्राटी कामगार नको : अशोक सावंत

वीज बिल वसुली मोहिमेमुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे वीज तोडणी साठी जाणाऱ्या कंत्राटी कामगारांना धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने वीज बिलांच्या वसुली साठी कंत्राटी कामगारांना पाठवू नये. त्या ऐवजी महावितरणकडे कायम सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना वसुली साठी पाठवा, असे कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी सांगितले.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!