सांस्कृतिक वैभव लाभलेले आचरा गोळीबार आणि चॉपर हल्ल्याने हादरले…

एक युवक जखमी ; संतप्त ग्रामस्थानी दोघा हल्लेखोरांना पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

संशयीत तरुण चरस, गांजाच्या व्यवसायाशी संबंधित ; सखोल चौकशी करून रॅकेटच्या मुळाशी जाण्याची ग्रामस्थांची मागणी

मालवण | कुणाल मांजरेकर

सांस्कृतिक वैभव लाभेलेले आचरा गोळीबार आणि चॉपर हल्ल्याने हादरल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सायंकाळी घडली. बंधाऱ्याच्या कामाला अटकाव करण्याची सुपारी दिल्याच्या संशयावरून हा हल्ला झाला. या हल्ल्यात एक युवक जखमी झाला. घटना कळताच जमा झालेल्या जमावाने हल्लेखोरांना अडवत पोलिसांना बोलून त्यांच्या ताब्यात दिले. यात सहभागी आणखी दोघांनी पलायन केले असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे. दरम्यान, हल्लेखोर चरस गांजा व्यवसायाशी संबंधित असून पोलिसांनी या रॅकेटच्या मुळाशी जाऊन सखोल तपास करावा, अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर आचरा तिठ्यावर ग्रामस्थांची गर्दी झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे आचरा आरोग्य केंद्राकडे दाखल झाले होते. घटनास्थळी चार पुंगळ्या आढळून आल्या. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार आचरा तिठानजीक सायंकाळी चारच्या सुमारास तौकिर या युवकाने आपणास मारण्याची सुपारी घेतली आहे. या संशयावरून त्या युवकांस आचरा डोंगरेवाडी, पारवाडी येथील युवकांनी जाब विचारला. यावेळी तेथील युवक व तौकीरमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर तो निघून गेला. काही वेळानंतर आणखी सहकारी घेऊन येत बाचाबाची करणाऱ्या युवकांच्या तवेरा गाडीसमोर दुचाकी आडवी घालून जाब विचारत फायरिंग केली. त्यानंतर गाडीतील गौरव पेडणेकर या युवकाच्या डाव्या हातावर वार करत दुचाकी वरून पळून जात असताना त्यांची गाडी स्लिप झाल्याने गाडी तिकडेच टाकत संशयित पळून जात होते. भरदिवसा रहदारीच्या रस्त्यावर झालेल्या घटनेने यावेळी उपस्थित प्रत्यक्षदर्शीनीं त्यांचा पाठलाग करत दोघांना पकडले तर दोघेजण पळून गेल्याचे बोलले जात होते.

प्रत्यशदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार फायरिंग करणारा शुभम जुवाटकर व दुचाकी चालवणारा प्रतिक हडकर यांना जमावाने पोलीस येईपर्यंत पकडून ठेवले होते. शुभम जुवाटकर हा मालवण दांडी तर दुचाकी चालवणारा प्रतिक हडकर हा चिंदर येथील असल्याचे समजते. जमावाबरोबर झालेल्या झटापटीत जुवाटकर याच्याकडील रिव्हॉल्वर व चॉपर रस्त्यावर पडलेले होते व संशयिताला पकडून ठेवलेल्या ठिकाणी पाकिट व चिलीम पडलेली होती. त्या वस्तू फायरिंग करणारा जुवाटकर याने फेकल्या असल्याचे ग्रामस्थ बोलत होते.

आचरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे व पोलीस अक्षय धेंडे, मनोज पुजारे, बाळू कांबळे दाखल झाले होते. आचरा पोलिसांनी पकडलेल्या दोघांना ताब्यात घेत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करत पुढील कारवाई सुरु केली होती. जमा झालेले ग्रामस्थ आक्रमक झाले होते. झालेल्या घटनेमुळे गावाची बदनामी झाली असून या घटनेत गुंतलेले संशयित हे चरस, गांजाच्या व्यवसायात गुंतलेले असून तरुण पिढी बरबाद करत आहेत. पिस्तूल आणि फायरिंग एवढ्याच घटनेची चौकशी न करता चरस गांजाचे रॅकेट चालविणाऱ्या या टोळीच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याची मागणी केली. या फायरिंच्या घटनेमागे आणखी काहींचा हात असणाऱ्यांना ताब्यात घेण्याची मागणी उपस्थित धोंडी चिंदरकर, जेरोन फर्नांडिस, राजन गावकर, महेश राणे, बाबू कदम, अभिजित सावंत, मंदार सरजोशी, प्रशांत गावकर व बहुसंख्य ग्रामस्थ हजर होते. वाढत्या गर्दीला काबूत आणण्यासाठी पोलीसांना आक्रमक पवित्रा घ्यावा लागला होता.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!