सिंधुदुर्गातील ७५६४ शेतकऱ्यांना खावटी कर्जमाफीचा लाभ ; सहकार मंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत निर्णय
सन २०१६ मध्ये पात्र ठरलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना १२कोटी ७४ लाख ८६ हजार मिळणार
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांची माहिती
सिंधुनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने मधील खावटी कर्जात अडकलेल्या व थकीत झालेल्या ७५६४ शेतकऱ्यांना राज्य शासनाने दिलासा दिला आहे. या शेतकऱ्यांचे १२ कोटी ७४ लाख ८६ हजार कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्याचा निर्णय सहकार मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत जाहीर केला आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, राजन तेली, अतुल काळसेकर व आपल्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई मंत्रालयात सहकार मंत्री अतुल सावे यांच्या दालनात बुधवारी ही बैठक झाली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ मार्च २०१६ अखेर पात्र ठरलेल्या ७५६४ शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र त्यानंतर आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी न केल्यामुळे हे कर्जदार शेतकरी अडचणीत आले होते व बँकेचे थकबाकीदार बनले होते. याबाबत आमदार नितेश राणे यांनी मंत्रालय पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर व आपण बँकेच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. बुधवारी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सहकार मंत्री अतुल सावे यांच्या दालनात ही बैठक झाली व शेतकऱ्यांचा रखडलेला हा प्रश्न मार्गी लागला असे मनिष दळवी यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने जिल्ह्यातील १६७ विविध कार्यकारी संस्थांमार्फत हे कर्ज वितरण केले होते. गेले अनेक वर्ष विकास संस्थांचे हे कर्ज थकीत राहिल्यामुळे या विकास संस्थाही अडचणीत आल्या होत्या. सहकारमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या या थकीत कर्जाचा प्रश्न मार्गी लागला आहे, व विकास संस्थांचाही प्रश्न यातून सुटला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ३१ मार्च २०१६ अखेरील पात्र ठरलेल्या ७५६४ शेतकऱ्यांची यादी निश्चित झाली होती. व तेवढ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. कर्ज थकीत राहिल्यामुळे त्यावरील व्याजही वाढले असून हा प्रश्न बँकेसमोर आता निर्माण झाला आहे. व्याजाची काही तोडगा काढण्याचाही प्रयत्न सुरू आहेत जिल्ह्यातील शेतकरऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री अतुल सावे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आभार मानले आहेत.