“स्टॅचू ऑफ युनिटी”च्या धर्तीवर मालवणात शिवरायांचे भव्य स्मारक उभारावे

मराठा समाज आणि समस्त शिवप्रेमींची मागणी घेऊन युवा नेते विशाल परब मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

वर्षा निवासस्थानी केली विविध विषयांवर चर्चा ; सिंधुदुर्गच्या भेटीचे निमंत्रण

मुंबई : शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालवणात “स्टॅचू ऑफ युनिटी”च्या मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, ही मराठा समाज आणि समस्त शिवप्रेमींची मागणी घेऊन भाजपचे युवा नेते तथा विशाल सेवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा विशाल परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी जिल्ह्याच्या विकासात्मक कामांबाबत चर्चा करतानाच मुख्यमंत्र्यांना सिंधुदुर्गच्या भेटीवर येण्याचे निमंत्रण त्यांनी दिले.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अॅड. संतोष सुर्यराव यासह अनेकजण उपस्थित होते. सिंधुदुर्गातील विविध खेळाडू, क्रिडाप्रेमींसाठी कुडाळ येथे भव्यदिव्य असे क्रीडा संकुल उभारण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केला होता. तळकोकणातील ह्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वर्षभरात पर्यटक येत असतात. यामुळे ह्या जिल्ह्यातील मंजूर झालेला सी- वर्ल्ड प्रकल्प तत्काळ व्हावा अशी मागणी विशाल परब यांनी केली आहे. कोकणातील बोंडू मोठ्या प्रमाणात गोव्यात जातो. ह्या बोंडूवर प्रकिया करून वाईन निर्माण करणारी वायनरी आरोंदा- शिरोडा सारख्या भागात व्हावी. तसेच यावर्षी आंब्याचे पीक फक्त २०% असल्याने शेतकरी व बागायतदार चिंतेत सापडला आहे. यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी विशाल परब यांनी यावेळी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून घाटमाथ्यावर जाणारा एकमेव जवळचा मार्ग असलेला आंजिवडा घाट लवकर फोडून झाराप-माणगाव दुकानवाड आंजीवडे पाट गावातील कोल्हापूर मार्ग सुरू करण्याची मागणीही निवेदनातून केली आहे. या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनीही सर्व निवेदन वाचून संबंधित विभागांना तात्काळ सुचना दिल्या आहेत.तर लवकरच कोकणचा दौरा करण्याची विनंती विशाल परब यांनी यावेळी केली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!