शिवगर्जना महानाट्याचा लाखो शिवप्रेमींनी घेतला लाभ ; शिवप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने विशाल परब भावुक !
हजारोंच्या जनसमुदाया समोर झाले नतमस्तक ; जनसेवेसाठी सदैव कटिबद्ध राहण्याची ग्वाही
कुडाळ | कुणाल मांजरेकर
भाजपाचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांचा ४२ वा वाढदिवस विशालसेवा फाउंडेशन चषक सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या वतीने यंदा प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विशालसेवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा विशाल परब यांच्या संकल्पनेतून विशालसेवा फाउंडेशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने कुडाळ नवीन बस स्थानकाच्या मैदानावर आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य “शिवगर्जना” चे शिवप्रेमींसाठी मोफत आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस झालेल्या या महानाट्याचा लाखो शिवप्रेमी नागरिकांनी लाभ घेतला. रसिकांनी दिलेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादाने विशालसेवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा विशाल परब भावुक झाले. रविवारी शिवगर्जना महानाट्याच्या अखेरच्या प्रयोगा दिवशी उपस्थित असलेल्या हजारो शिवप्रेमींसमोर ते नतमस्तक झाले. जनसेवेसाठी सदैव कटिबद्ध राहण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
युवानेते विशाल परब हे नेहमीच भव्य दिव्य कार्यक्रमांच्या आयोजनासाठी प्रसिद्ध आहेत. माजी खा. निलेश राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणाऱ्या विशाल परब यांनी निलेशजी राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विशाल सेवा फाउंडेशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आयोजित शिवगर्जना महानाट्याचे कुडाळ येथे भव्यदिव्य वातावरणात विशाल आयोजन केले होते. हा नाट्य प्रयोग एका दिवसासाठी ठेवण्यात आला होता. मात्र शिवप्रेमींचा प्रतिसाद पाहून तीन दिवस हा महानाट्याचा प्रयोग ठेवण्यात आला. गेले तीन दिवस चाललेल्या या महानाट्याच्या अंतिम दिवशी देखील शिवप्रेमी जनतेने दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून भावनाविवश झालेल्या विशाल सेवा फाउंडेशन फाउंडेशन चे सर्वेसर्वा विशाल परब यांनी आभार व्यक्त करताना सर्व शिवप्रेमी समोर नतमस्तक होऊन आपल्या संयमी आणि नम्रतेचे दर्शन दाखवून दिले. त्यांनी केलेल्या या वेगळ्या प्रयोगाने जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमी जनता आनंदली असून त्यांनी मनापासून विशाल परब यांना आशीर्वाद दिले आहेत. याही पुढे अशा रीतीने आपण लोकांच्या सेवेसाठी आणि सामाजिक कार्यासाठी कटिबद्ध राहणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हितासाठी धावून जाणार असल्याचे विशाल परब यांनी यावेळी बोलताना सांगितले.