मालवणात कुकीज बिस्कीट, मॉकटेल बनवण्याच्या प्रशिक्षणाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर भाजपच्या वतीने आयोजन
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथे भारतीय जनता पार्टी तर्फे एक दिवसीय कुकीज बिस्कीट व मोकटेल सरबत बनवणे याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थानिक उत्पादन होणाऱ्या धान्यापासून बिस्किटे बनवण्याचे आवाहन केले होते . त्यास अनुसरून जव, नाचणी पासून बिस्कीट बनवण्याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले. तसेच वेगवेगळे मॉकटेल बनवण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले.
या प्रशिक्षणाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. सर्व महिलांना मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. त्याचबरोबर कोकम, जांभूळ, करवंदे, काजू यांच्यापासून कशी सरबते बनवता येतात, याची पण माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला शहर प्रभारी विजय केनवडेकर शहर यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर वेगवेगळे उद्योग उभे राहण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली. जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी सिंधुदुर्ग बँकेमध्ये महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या योजनेतून आर्थिक सहाय्य करण्यात येत असून त्याचा फायदा जास्तीत जास्त महिलांनी घेऊन व्यवसाय करावा असे आवाहन केले. त्याचबरोबर माजी नगरसेवक गणेश कुशे यांनी प्रशिक्षण घेऊन न थांबता आपण त्याचा व्यवसाय करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षण घेऊन चांगल्या प्रकारे व्यवसाय करून आर्थिक सक्षम व्हावे, असे सांगितले. या कार्यक्रमाला सौ पूजा करलकर, सौ.पूजा सरकारे, सौ पूजा वेरलकर, सौ. स्नेहल बिरमोळे सरपंच घुमडे, सौ. पूनम वाटेगावकर सरपंच कुंभारमाठ सौ. महिमा मयेकर, सौ. शर्वरी पाटकर, सौ.महानंदा खानोलकर, सौ. वैष्णवी मोडकर, दिव्या कोचरेकर, भाई मांजरेकर, ललित चव्हाण, सुनील बागवे, नरेंद्र जामसंडेकर उपस्थित होते.