तब्बल ५० वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांनी अनुभवल्या शालेय जीवनातील आठवणी
मालवणच्या भंडारी हायस्कुल मध्ये कार्यक्रम : प्रशालेला आर्थिक मदतही सुपूर्द
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण येथील भंडारी हायस्कुल मध्ये १९७३ ते १९७५ पर्यंत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत पुन्हा एकदा शालेय जीवनातील आठवणीना उजाळा दिला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. तसेच माजी विद्यार्थ्यांनी जमा केलेली ८३,६६६ रुपयांची मदत शाळेचे मुख्याध्यापक वामनराव खोत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
मालवण मधील भंडारी हायस्कुल मध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. या स्नेह मेळाव्यात १९७३ ते १९७५ च्या बॅचचे मिळून ३८ माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळेतील शिक्षक आणि नववी, दहावीच्या विद्यार्थिनीनी माजी विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले. त्या नंतर मुख्याध्यापक वामनराव खोत यांनी त्यांना शाळेच्या प्रगतीचा आढावा दिला. यामध्ये नवीन उपक्रमांचा समावेश होता. यावेळी कॉम्प्युटर लॅब, बालवाडी आणि नर्सरी यांची माहिती दिली. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन स्वागत आणि सत्काराने झाली. या कार्यक्रमात सर्व माजी विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक वामनराव खोत, माजी शिक्षक रवींद्र वराडकर, यमनाजी राजूरकर, जयवंत ढोलम, सौ. संध्या पाटकर उभयता आणि शाळेचे स्थानिक कमिटीचे अध्यक्ष दशरथ कवटकर उपस्थित होते. या स्नेहमेळाव्यात भारती कोरगावकर- नार्वेकर यांनी सूत्र संचालन केले. सर्व विद्यार्थ्यांनी आपापला परिचय करून दिल्या नंतर रत्नाकर सोहनी, अरविंद कोरगावकर, विद्या म्हापसेकर, गजा मालंडकर, ऍड. उल्हास कुलकर्णी, दिलीप मांजरेकर, विलास सरमळकर यांनी कला सादर केली.