कांदळगावच्या रामेश्वराची पालखी मालवणात ; रामेश्वर मांडावर भाविकांची गर्दी
व्यापारी वर्गाने केले उत्स्फूर्त स्वागत ; महाप्रसादानंतर देवस्वारीचा परतीचा प्रवास सुरु होणार
मालवण | कुणाल मांजरेकर
किल्ले सिंधुदुर्गवरील छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी भवानी मातेच्या त्रैवार्षिक भेटीवर आलेल्या कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वराच्या देवस्वारीचे शनिवारी दुपारच्या सुमारास मालवण शहरात आगमन झाले. यावेळी मालवण व्यापारी संघ आणि शहरातील भाविकांनी देवस्वारीचे उत्स्फूर्त स्वागत केले. शहरातील रामेश्वर मांडावर ही पालखी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. याठिकाणी भाविकांची अलोट गर्दी उसळली असून येथे भाविकांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला होता. महाप्रसाद झाल्यानंतर सायंकाळी येथून पालखीचा परतीचा प्रवास सुरु होणार असून रात्री पालखीच्या विसर्जनानंतर श्री देव रामेश्वर आपल्या राहुळात विराजमान होणार आहे.
कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वर दर तीन वर्षानी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील श्री शिवराजेश्वर आणि भवानी मातेला भेटण्यासाठी आपल्या लवाजम्यासह दाखल होतो. शिवकाळापासून ही परंपरा सुरु आहे. शुक्रवारी देवस्वारी किल्ल्याच्या दिशेने रवाना झाली. शनिवारी दुपारी किल्ल्यावर भेटीचा सोहळा पार पडल्यानंतर देवस्वारीचे रात्रौ मेढा येथील श्री मौनीनाथ मंदिरात आगमन झाले. सकाळी कुशेवाड्यात पालखीने भेट दिल्यानंतर दुपारी वाजत गाजत पालखी शहरातील रामेश्वर मांडाच्या दिशेने रवाना झाली. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या पालखीचे रामेश्वर मांडावर आगमन झाले.
याठिकाणी व्यापारी वर्गाने पालखीचे स्वागत केले. येथे भाविकांची गर्दी उसळली होती. याठिकाणी आलेल्या भाविकांसाठी व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांच्या निवासस्थानी तसेच भंडारी हायस्कुल हॉलच्या मागेमहाप्रसाद ठेवण्यात आला होता. तसेच उमेश नेरूरकर, अंकित नेरूरकर यांच्या वतीने भाविकांसाठी मोफत सरबत वाटप करण्यात आले. सायंकाळी देवस्वारी कांदळगाव मुक्कामी मार्गस्थ होणार आहे.