सांगलीतील व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचं कोकण किनारपट्टी कनेक्शन ; मालवणातून एक ताब्यात

सांगली एलसीबीच्या पथकाची कारवाई ; आतापर्यंत तीन जणांना अटक

संशयितांकडून २४ कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी हस्तगत

मालवण | कुणाल मांजरेकर

सांगली येथील अम्बरग्रिसच्या (व्हेलची उलटी) तस्करी प्रकरणात आता कोकण किनारपट्टीवरील कनेक्शन समोर आले आहे. सांगली एलसीबीच्या पथकाने शनिवारी मालवण येथून निलेश रेवंडकर याला अटक केली आहे. मालवण पोलिसांनी निलेश याच्याकडून जप्त केलेले १८.६०० किलोचे अम्बरग्रिसही सांगली पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. याप्रकरणात आतापर्यंत तीन संशयितांना अटक करण्यात आली असून, सुमारे २४ कीलोचे अम्बरग्रिस जप्त करण्यात आले आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २४ कोटी रुपये किंमत असल्याचे बोलले जात आहे.

सांगली येथील एलसीबीच्या पथकाने बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी सांगली येथील शामराव नगर परिसरात सापळा रचून तस्करी साठी आणलेली ५.६०० किलोग्रॅम वजनाची व्हेलची उलटी जप्त केली होती. त्याबरोबर सलीम गुलाब पटेल (वय ४९, रा. खणभाग, सांगली) व अकबर याकूब शेख (५१, रा. पिंगळी कुडाळ, सिंधुदुर्ग) यांनाही अटक करण्यात आली होती. संशयितांकडे कसून चौकशी केली असता तस्करी साठी आणण्यात आलेली व्हेलची उलटी मालवण तळाशिल येथील निलेश रेवंडकर यांच्या जवळील असल्याचे तपासात समोर आले होते.

दरम्यान गुरुवारी ९ फेब्रुवारी रोजी रात्री मालवण येथील पोलिस हेड कॉन्स्टेबल सुशांत पवार, व एच व्ही पेडणेकर यांच्या पथकाने तळाशिल, मालवण येथून निलेश प्रकाश रेवंडकर यांच्या कडून वाळूत लपवून ठेवलेली १८.६०० किलो वजनाची व्हेलची उलटी जप्त केली होती. या कारवाई बाबतची माहिती मालवण पोलिसांनी सांगली येथील एलसीबीच्या पथकाला दिली होती.

सांगली एलसीबी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पीएसआय महादेव पोवार, पीएसआय विशाल येळेकर व त्यांचे पथक शनिवारी मालवण येथे दाखल झाले. त्यांनी निलेश रेवंडकर यांच्यावर अटकेची कारवाई करतानाच त्यांच्याकडे सापडून आलेली आणि मालवण पोलिसांच्या ताब्यात असलेली व्हेलची उलटी आपल्या ताब्यात घेतली. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या सर्व संशयितांवर वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये कारवाई करण्यात आली असून वन्य जीव तस्करी प्रकरणातील रॅकेटचा लवकरच उलगडा करण्यात येईल, असा विश्वास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!