महिलेच्या अपघाती मृत्यूनंतर काळसे ग्रामस्थ आक्रमक ; रास्तारोकोमुळे वाहतुकीचा खोळंबा
डंपरमालकाशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे, मृतदेहही घेतला ताब्यात ; चालकाला अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी
मालवण | कुणाल मांजरेकर
काळसे होबळीचामाळ येथे झालेल्या भीषण अपघातात रुक्मिणी पांडुरंग काळसेकर यांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर आज दुपारनंतरही अपघातग्रस्त डंपरचा मालक न आल्याने मयताचे नातेवाईक आणि काळसे रमाईनगर येथील ग्रामस्थ आक्रमक झाले. संतप्त ग्रामस्थांनी दुपारी आणि सायंकाळी दोन वेळा रस्त्यावर ठिय्या मारत रास्ता रोको केला. अपघातातील मयत तसेच जखमी महिलांना न्याय मिळावा यासाठी जोपर्यंत डंपर मालक पोलीस स्थानकात किंवा घटनास्थळी हजर होऊन नातेवाईकांच्या मागण्या पूर्ण करून अपघातग्रस्त जखमी आणि मयतांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मयत रुक्मिणी काळसेकर यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला. डंपरमालकाने मालवण पोलीस ठाण्यात येऊन मयताच्या मुलाशी आणि ग्रामस्थांशी केलेल्या चर्चेनंतर निघालेल्या तोडग्याने ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले. तसेच मृतदेह ताब्यात घेतला.
दरम्यान, अपघात प्रकरणी पादचारी महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी डंपर चालक इकलास इस्माईल शेरखान (वय ३३) रा. चंदगड कोल्हापूर याच्यावर भादवी कलम ३०४, २७९, ३३७,३३८ व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. इकलास याला मालवण पोलिसांनी अटक करून मालवण न्यायालयात हजर केले असता सोमवार पर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणी सहाय्यक सरकारी अभियोक्ता तुषार भणगे यांनी काम पाहिले.
काळसे होबळीचा माळ येथे भरधाव डंपरने पाच पादचारी महिलांना धडक दिल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. यात वृद्ध महिला रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (६५) यांचा मृत्यू झाला. तर अन्य चार महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत्युमुखी पडलेल्या रुक्मिणी पांडुरंग काळसेकर शवविच्छेदन करण्यात आले. मात्र मृतदेह ताब्यात घेणार नाही असे सांगत काळसे ग्रामस्थ शुक्रवारी सकाळी मालवण पोलीस ठाण्यात एकवटले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या डंपरचा मालक जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच योग्य प्रकारे गुन्हा नोंद झाला पाहिजे. योग्य कलमांची नोंद झाली पाहिजे. अपघात स्वरूप पाहून कठोर स्वरूपात कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. चालक पूर्णपणे दारूच्या नशेत असल्याचेही प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, डंपरचा मालक मालवणात येण्यास विलंब होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी काळसे येथे रास्तारोको केले. या आंदोलनाची माहिती पोलीस पाटील विनायक प्रभु यांनी पोलीस स्थानकात देताच मालवण पोलीस उपनिरीक्षक झांजुर्णे, पोलीस हवालदार एस. एस. शिवगण , एच. व्ही. पेडणेकर, सुशांत पवार, धोंडी जानकर, पो. कॉ. प्रतिक जाधव, कैलास ढोले आदी आंदोलनस्थळी दाखल झाले. आणि आंदोलनकर्त्या नातेवाईक व ग्रामस्थांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. या चर्चेतही समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने रमाईनगर ग्रामस्थांनी सायंकाळी पुन्हा रस्त्यावर ठिय्या मारत रास्ता रोको केले. या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, सरपंच विशाखा काळसेकर, कुडाळ नगरपंचायत नगरसेवक तथा गटनेता विलास कुडाळकर, माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, भूपेश चेंदवणकर, राजन आंबेरकर यांच्यासह काळसे रमाईनगर ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी दोन्ही बाजुची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यावेळी आंदोलनात सहभागी महिला अधिक आक्रमक झाल्या. त्यांनी गावातील संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी गतीरोधक घालण्याची मागणी केली आणि मयत रुक्मिणी काळसेकर यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांकडे केली .
दरम्यान सायंकाळी अपघातातील डंपरचा मालक सायंकाळी चंदगड येथून मालवण पोलीस स्थानकात हजर झाल्यानंतर मयत रुक्मिणी काळसेकर यांचा मुलगा दीपक काळसेकर, माजी सभापती राजेंद्र परब, प्रमोद काळसेकर आणि नातेवाईक यांनी डंपर मालकासोबत चर्चा करून मयत आणि जखमी महिलांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी डंपर मालकाने ग्रामस्थांच्या मागण्या मान्य केल्या. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेउन प्रमोद काळसेकर, दीपक काळसेकर यांनी दूरध्वनी वरून आंदोलनकर्त्यांशी संपर्क साधून रास्ता रोको मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर काळसे रमाईनगर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. पण काळसे गावातील रस्त्यावर चार दिवसात गतिरोधक न घातल्यास आणि अवजड वाहनांना वेगमर्यादा घालून न दिल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करू असा इशारा उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना दिला. रात्री शोकाकुल वातावरणात अपघातात मयत झालेल्या रुक्मिणी काळसेकर यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले.