शक्ती आणि भक्तीचा अनोखा संगम ….

कांदळगावच्या श्री देव रामेश्वराची स्वारी किल्ले सिंधुदुर्गच्या भेटीला

मालवणनगरी भक्तीरसात चिंब ; पालखी समवेत हजारो भाविकांची उपस्थिती

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवकालीन वारसा लाभलेल्या कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराने शुक्रवारी आपल्या वारेसूत्र, तरंग व रयतेसह हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांची किल्ले सिंधुदुर्गवर जाऊन भेट घेतली. या त्रैवार्षिक भेट सोहळ्याच्या निमित्ताने रामेश्वराच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी गुढ्या, तोरणे, सडा रांगोळी काढून रस्ते सजवण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्ताने कांदळगाव ते मालवण पर्यंतच्या मार्गावर भाविकांची अलोट गर्दी लोटली होती. दोन दिवस हा सोहळा रंगणार आहे. शनिवारी श्री देव रामेश्वर शहरातील रामेश्वर मांडावर थांबणार आहे.

कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर दर तीन वर्षांनी किल्ले सिंधुदुर्गवरील छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिशक्ती भवानी मातेच्या भेटीसाठी येतो. शिवकाळापासून भेटीचा हा सिलसिला सुरू आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाविक भक्तगण मोठ्या संख्येने श्री देव रामेश्वराच्या पालखीसह मिरवणुकीत सहभागी होतात. शुक्रवारी सकाळी ९ वाजता देव रामेश्वर यांचे आपल्या वारेसुत्र, तरंग व रयतेसह मालवणला प्रयाण झाले, मार्गात सर्वत्र स्वागत करण्यात येत होते. दुपारी जोशीमांड मेढा, मालवण येथे पालखीचे आगमन झाल्यानंतर येथे भाविकांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला होता. दुपारनंतर रामेश्वराची पालखी समुद्रमार्गे किल्ले सिंधुदुर्ग येथे देव रामेश्वर, शिवाजी महाराज व आदिमाया भवानी माता यांच्या भेटीसाठी मार्गस्थ झाली. येथे छत्रपती शिवाजी महाराज आणी आदीशक्ती भवानी मातेची भेट घेतली. श्री देव रामेश्वर सिंधुदुर्ग किल्ल्यावर आल्यानंतर किल्ल्यावरील प्रमुख मानकरी कुटुंबिय यांच्याकडून पालखीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर छत्रपतींकडून श्री देव रामेश्वराला नजराणा देऊन सर्व वारेसुत्रांचाही सन्मान करण्यात आला. देव रामेश्वराने देखील यावेळी छत्रपतींना सन्मानित केल्यानंतर देव रामेश्वर आपल्या वारेसुत्र आणि तरंगासह भवानी मातेसह किल्ल्यातील सर्व मंदिरांना भेट दिली. या सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

असा आहे इतिहास…

हिंदवी स्वराज्याचे परकीय शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या समुद्रातील कुरटे बेटावर सिंधूदुर्ग किल्ल्याच्या उभारणीचा निर्णय घेतला. मात्र किल्ल्याचा पश्चिम तट उभा राहत नव्हता. यावेळी कांदळगावच्याा रामेश्वराने छत्रपती शिवरायांना दृष्टांत होता. यानंतर महाराज रामेश्वराच्या भेटीसाठी कांदळगावात पोहोचले. त्या ठिकाणी श्री देव रामेश्वराची – पूजाअर्चा करुन छत्रपतींनी तेथील शिवपिंडीवर एक छोटीशी घुमटी बांधली आणि आठवण म्हणून त्या घुमटीसमोर वडाचे एक छोटेसे रोपटे लावले. याच भेटी दरम्यान छत्रपतींनी दर तीन वर्षांनी श्री देव रामेश्वराला किल्ले सिंधुदुर्गावर भेटीसाठी यावे असे सांगितले. रामेश्वरानेही आनंदाने कबूल केले. त्यानंतर किल्ले सिंधुदुर्गचा पश्चिमेकडचा तट पूर्णत्वास जावून हिंदवी स्वराज्याची सागरी राजधानी किल्ले सिंधुदुर्ग उभा राहिला. छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री देव रामेश्वर यांच्या या भेटीचा सिलसिला इतिहास काळापासून सुरु झाला आहे तो आजपर्यंत तसाच सुरु आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिल्यानंतर सायंकाळी देव दांडेश्वर मंदिर, दांडी येथे पालखीचे आगमन झाले. तर रात्री मौनीनाथ मंदिर, मेढा मालवण येथे मुक्काम होता. ११ फेब्रुवारीला सकाळी ८ नंतर कुशेवाडा मेढा येथे प्रकाश कुशे यांच्या घरी कुशे कुटुंबियांना पारंपरिक भेट व आशीर्वचन, सकाळी १० नंतर रामेश्वर मांड, बाजारपेठ येथे आगमन, दुपारी १२ नंतर रामेश्वर मांड मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन, सायंकाळी ४ वाजता रामेश्वर मांड येथून रामेश्वर मंदिर, कांदळगाव येथे प्रयाण असा पालखीचा कार्यक्रम होणार आहे.

होडींची मोफत व्यवस्था

श्री देव रामेश्वराच्या पालखी सोहळ्यानिमित्ताने यंदाही भाविक रयतेला किल्ल्यावर जाण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशन, मालवण, शिवशक्ती जलपर्यटन संस्था, मालवण, रामचंद्र महादेव आचरेकर व दांडी गाव यांच्यावतीने मोफत होडीची सोय करण्यात आली होती. हा सोहळा शनिवारी देखील रंगणार असून या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ कांदळगाव अध्यक्ष उदय लक्ष्मण राणे, सचिव संतोष नारायण परब देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये विश्वस्त मंडळ, कांदळगाव मानकरी व ग्रामस्थांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3840

Leave a Reply

error: Content is protected !!