शिवसेनेच्या वतीने किल्ले सिंधुदुर्गवर १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव

आ. वैभव नाईक यांच्यासह शिवप्रेमींची उपस्थिती ; शिल्पा खोत यांची माहिती

शिवजन्म सोहळ्याबरोबर वेशभूषा स्पर्धेचेही आयोजन ; मंदिर परिसर भगवामय करणार

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी शासकीय शिवजयंती उत्सव किल्ले सिंधुदुर्ग येथे आमदार वैभव नाईक व शिवप्रेमींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने शिवचरित्रावर आधारित वेषभूषा स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर किल्ले परिसर भगवामय करण्यात येणार असल्याची माहिती कुडाळ- मालवण विधानसभा युवती सेना प्रमुख शिल्पा खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथील शिवसेना शाखेत ही पत्रकार परिषद झाली. यावेळी महिला आघाडी उपतालुकाप्रमुख अंजना सामंत, नंदा सारंग, युवती सेना तालुका प्रमुख निनाक्षी शिंदे, उपतालुकाप्रमुख रूपा कुडाळकर, विद्या फर्नांडिस, मंदा जोशी, दीपाली पवार, आर्या गावकर, दीक्षा गावकर, प्रज्ञा कदम, रिया आचरेकर, संतोष अमरे, माजी नगरसेवक यतीन खोत, सिद्धेश मांजरेकर, सुरेश मडये यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवजयंती सोहळ्याच्या निमित्ताने किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवजन्म क्षण सोहळा सादर होणार आहे. दरवर्षीप्रमाणे ऐतिहासिक वेशभूषा परिधान करून शिवप्रेमी, महिला या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. जयंतीनिमित्त किल्ले सिंधुदुर्गवरील शिवराजेश्वर मंदिरात छत्रपतींना जिरेटोप प्रदान केला जाणार आहे. ५ ते १० वर्षे तसेच खुला गटासाठी शिवचरित्रावर आधारित वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे शिल्पा खोत-९३२६४७७७०७, निनाक्षी शिंदे- ९३२५९४२७९८, आर्या गावकर-९४२३३२१२३० यांच्याकडे नोंदवावीत. या सोहळ्यात शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!