कौटुंबिक जमीन जागेच्या वादातून दोन गटात मारहाण ; सख्ख्या भावाला दुखापत
मुलाची आई, वडील, भाऊ, वहिनीसह पाच जणांविरोधात तक्रार ; वडिलांच्या तक्रारीनुसार मुलासह त्याच्या मित्रांवर गुन्हे दाखल
परस्पर विरोधी तक्रारीनुसार १२ जणांवर गुन्हा दाखल ; चाफेखोल इंदुलकरवाडी येथील घटना
मालवण | कुणाल मांजरेकर
कौटुंबिक जमीन जागेच्या वादातून एकाच कुटुंबातील दोन गटात झालेल्या मारहाणी मध्ये परस्परांवर दगडफेकीचा प्रकार घडला असून यामध्ये वडिलांसह सख्ख्या भावाला दुखापत झाली आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी नंतर दोन्ही गटातील १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना मंगळवारी १० जानेवारी रोजी दुपारी २ वाजता मालवण तालुक्यातील चाफेखोल इंदुलकरवाडी येथे घडली.
चाफेखोल इंदुलकरवाडी येथे अल्पेश एकनाथ निकम आणि त्याचे वडील एकनाथ भगवान निकम यांच्यात जमीन जागेवरून वाद सुरु आहेत. या वादावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी १० जानेवारी रोजी दुपारी दोन्ही बाजूंची बैठक आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान वादावादी होऊन एकमेकांवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अल्पेश निकम याच्या फिर्यादीनुसार त्याचे वडील एकनाथ भगवान निकम, भाऊ अजित एकनाथ निकम, चुलत भाऊ संतोष हरिश्चंद्र निकम, आई मालिनी एकनाथ निकम, वहिनी सोनाली अजित निकम या पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर वडील एकनाथ भगवान निकम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगा अल्पेश एकनाथ निकम, त्याचा मित्र यशवंत अर्जुन घाडीगावकर, दीपक वरक, बबन विठ्ठल शिंदे, लीलाधर सीताराम ढवळे, लावण्या लीलाधर ढवळे, भारती भरत पाटकर आणि अन्य दोन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मराहणीत अजित निकम याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. उपनिरीक्षक सुनील चव्हाण अधिक तपास करीत आहेत.