देवली सड्यावर मिळून आलेले २६ डंपर आणि वाळूसाठे जाग्यावर सील ; दोन डंपर तहसील कार्यालयात !

अनधिकृत वाळू प्रकरणी मालवणात महसूल प्रशासन आक्रमक

डंपर पळून गेल्यास होणार फौजदारी कारवाई ; तहसीलदार श्रीधर पाटील यांची माहिती

मालवण | कुणाल मांजरेकर

देवली सड्यावर मिळून आलेला अनधिकृत वाळू साठा आणि डंपर प्रकरणात महसूल प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. देवलीत मिळून आलेल्या २६ डंपर पैकी दोन डंपर तहसील कार्यालयात आणण्यात आले असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. तर उर्वरित २६ डंपर आणि दोन ठिकाणचे वाळू साठे जाग्यावरच सील करण्यात आले आहेत. त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मात्र हे डंपर आणि वाळू साठे येथून गायब संबंधित डंपर मालक आणि जमीन मालकांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे.

मालवण तालुक्यातील अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतुकीवर तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने धडक कारवाई सुरू आहे. सागरी महामार्गावरून आतील कच्च्या रस्त्यावर देवली सडा येथे अनधिकृत वाळू साठा केलेल्या ठिकाणी आलेले सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक पासिंगचे २८ डंपर महसूल पथकाने ताब्यात घेतले. तर त्याठिकाणी असलेला अनधिकृत वाळूसाठाही सील केला आहे. दरम्यान, सील केलेल्या वाळू साठ्या पासून काही अंतरावर एका कुंपणात अजून ८० ब्रास वाळू साठा शुक्रवारी दुपारी महसूल पथकाला सापडून आला. हा वाळू साठाही सील करण्यात आला आहे.

8

तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक एस ए भोसले (ओरोस), मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव, पीएसआय झांजुरणे, सुभाष शिवगण, प्रतीक जाधव, पांचाळ यासह अन्य पोलीस कर्मचारी महसूल व पोलीस पथकाने ही कारवाई केली. प्रांताधिकारी अविशकुमार सोनाणे, आरटीओ आदी घटनास्थळी दाखल झाले. पुढील कारवाई, गाड्यांची तपासणी, पंचनामे आदी कारवाई सायंकाळी उशिरा पर्यत सुरू होती.

२८ डंपर पैकी ज्या दोन डंपर मध्ये वाळू साठा भरून होता ते डंपर पुढील दंडात्मक कारवाईसाठी मालवण तहसील कार्यालयात नेण्याची कारवाई करण्यात आली. तर काही डंपर चालकांनी भरलेली वाळू ओतली. त्याचेही पंचनामे करण्यात आले. डंपर मध्ये वाळू भरण्यासाठी असलेला एक जेसीबी पळून गेला आहे. त्याचीही माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे महसूल पथकाने सांगितले.

२६ डंपर व वाळू साठा सील

महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियम १९६६ चे कलम ४८ नुसार २६ डंपर व अनधिकृत वाळू साठा पंचनामा करून सील करत पुढील कारवाईपर्यत त्याच ठिकाणी ठेवण्यात आला आहे. डंपर व वाळू साठा जागेवरून नेण्याचा प्रयत्न झाल्यास पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद केले जाणार आहेत. संबंधितांवर दंडात्मक कारवाई लाखोंच्या पटीत होऊ शकते, अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!