मोदी एक्स्प्रेस संदर्भात आमदार नितेश राणेंनी दिलीय “ही” महत्वपूर्ण माहिती
ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत आ. नितेश राणेंचे प्रवाशांना आवाहन
कुणाल मांजरेकर
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून मोफत मोदी एक्स्प्रेस रेल्वे सोडली जाणार आहे. येत्या ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झेंडा दाखवून ही रेल्वे कोकणच्या दिशेने मार्गस्थ होणार असून या रेल्वे प्रवासाबाबत आमदार नितेश राणे यांनी महत्त्वपूर्ण माहिती शेअर केली आहे. या संदर्भातील व्हिडिओ आ. राणेंनी ट्विटरवर शेअर केला आहे.
कोकणात जाण्यासाठी ७ सप्टेंबर रोजी सोडण्यात येणाऱ्या मोफत मोदी एक्स्प्रेस रेल्वेची क्षमता १८०० प्रवासी असून यासाठी बुकिंग केलेल्या प्रवाशांची यादी पूर्ण करून त्यांना पासेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या पासेस शिवाय कोणालाही या रेल्वेमधून सोडले जाणार नाही. बुकिंग केलेल्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वरून सकाळी १० वाजता मोदी एक्स्प्रेस निघणार आहे. रेल्वे स्थानकावर स्वयंसेवक नियुक्त करण्यात येणार आहेत. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याहस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार असून यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत. तरी प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.