दिवा पॅसेंजरला खारेपाटण रेल्वे स्थानकात थांबा ; संघर्ष समितीच्या लढ्याला यश ….
खारेपाटण रोड-चिंचवली रेल्वे स्टेशनवर ७ सप्टेंबरला थांबणार दिवा पॅसेंजर
संघर्ष समिती ट्रेनच्या स्वागतासाठी सज्ज : सूर्यकांत भालेकर यांची माहिती
वैभववाडी (प्रतिनिधी)
खारेपाटण रोड – चिंचवली रेल्वे स्टेशन प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. मंगळवार दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. सावंतवाडी – दादर ही पहिली पॅसेंजर ट्रेन या स्टेशनवर थांबणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून खारेपाटण रोड चिंचवली रेल्वे संघर्ष समितीला देण्यात आली आहे. या ट्रेनचे जंगी स्वागत संघर्ष समिती व नागरिकांच्या उपस्थितीत केले जाणार असल्याची माहिती समितीचे सचिव सूर्यकांत भालेकर यांनी दिली आहे.
या स्वागतप्रसंगी आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि. प. सदस्य बाळा जठार, पं. स. सदस्या सौ.तृप्ती माळवदे, संघर्ष समितीचे अध्यक्ष नासीर काझी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. खारेपाटण दशक्रोशीसाठी चिंचवली येथे रेल्वे स्टेशन व्हावे अशी येथील जनतेची खूप वर्षांपासून मागणी होती. यासाठी रेल्वे स्टेशन संघर्ष समितीमार्फत मोठे जनआंदोलन उभे करण्यात आले. या आंदोलनाची तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री कोकण सुपुत्र सुरेश प्रभू यांनी दखल घेऊन या स्टेशनला तात्काळ मंजुरी दिली. आज हे स्टेशन प्रवाशांच्या सेवेत दाखल होत असल्याने खारेपाटण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी या स्वागत समारंभासाठी खारेपाटण परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री. भालेकर यांनी केले आहे.