दोन वर्षापासून फरारी आरोपी जाळ्यात ; एलसीबीची गोव्यात कारवाई

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकारणी गेल्या 2 वर्षापासून फरारी असलेला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने गोव्यातील कोलवाळ पोलीस ठाणे हद्दीत अटक केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली.

सावंतवाडी पोलीस ठाणे गु.र.नं. 292 / 2020 भा. दं.वि. क. 406,420,34 हा गुन्हा दि. 22.10.2020 रोजी दाखल आहे. या गुन्हयातील दोन आरोपींनी एकमेकांच्या संगनमताने फिर्यादी व अन्य 15 साक्षीदार यांना प्रत्येकी 1 लाख रुपये कर्ज देण्याचे अमिष दाखवून फिर्यादी व अन्य 15 साक्षीदारांकडून प्रत्येकी 3000 रु. कर्ज मिळवून देण्यासाठी एकूण 48000 रु. स्वीकारुन त्यांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल आहे. या गुन्हयातील आरोपी क्र.1 हा गुन्हा दाखल झाल्यापासून तो आपले राहण्याची ठिकाणे वारंवार बदलून पोलीसांना चकवा देत होता. अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप भोसले व सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, स्थानिक गुन्हे शाखा, यांच्या पथकाने सुमारे 2 वर्षापासून फरारी असलेला आरोपीला जेरबंद करण्यसाठी विशेष मोहीम राबवून, तांत्रिक मदतीच्या सहायाने पाहिजे आरोपीच्या ठावठिकाणाबाबत माहिती गोळा केली. आरोपी आपले वास्तव्याचे ठिकाण वारंवार बदलत होते. 22 डिसेंबर रोजी गोवा राज्यातील कोलवाळ पोलीस ठाणे हद्दीत, थीवीम फुटबॉल ग्राऊंड जवळील बस स्टॉपजवळ, आरोपी येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यावर, स्थानिक पोलीसांना माहिती देवून, आरोपी हा आपले अस्तित्व लपवून सदर ठिकाणी आल्यावर पोलीस पथकाने खात्री करुन, त्यास ताब्यात घेवून पुढील तपासकामी सावंतवाडी पोलीस ठाण्यात हजर केलेले आहे.
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदिप भोसले, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, सहायक पोलीस निरीक्षक बळीराम सुतार, हवालदार, गुरुनाथ कोयंडे, हवालदार प्रकाश कदम, हवालदार अनुपकुमार खंडे, नाईक चंद्रकांत पालकर, नाईक प्रथमेश गावडे यांनी सहभाग घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्हा दलाच्या अभिलेखावरील पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्याकरीता विशेष मोहीम राबविण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखाला सूचना दिलेल्या होत्या.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!