कोळंबमध्ये मतदारांनी भाकरी परतली ; तब्बल ३० वर्षांनी सत्तापालट ; ग्रा. पं. वर भगवा फडकला !
सरपंच निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या नवोदीत उमेदवार सिया रामचंद्र धुरी यांचा १०५ मतांनी विजय
भाजपाला अनपेक्षित पराभवाचा धक्का ; ग्रा. पं. मध्येही ९ पैकी ६ जागा मिळवत शिवसेनेचे वर्चस्व
मालवण | कुणाल मांजरेकर
नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मालवण तालुक्यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. यामधीलच एक निकाल म्हणजे कोळंब ग्रा. पं. चा ! गेली ३० वर्षे राणे समर्थकांच्या ताब्यात असलेल्या या ग्रा. पं. मध्ये पुन्हा एकदा राणेंच्या विचारांची अर्थात भाजपची सत्ता येणार हे गृहीत मानले जात होते. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या सावध खेळीमुळे गाफिल राहिलेल्या भाजपाला येथे धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. सरपंच पदासाठी ठाकरे गटाने सिया रामचंद्र धुरी या नवोदीत उमेदवाराची केलेली निवड आणि प्रचाराला शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मिळालेली साथ यामुळे सरपंचपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिया धुरी यांनी भाजपच्या भुवनेश्वरी नंदू कामतेकर यांचा १०५ मतांनी पराभव केला. ग्रा. पं. मध्येही ९ पैकी ६ जागा मिळवत ठाकरे गटाने वर्चस्व मिळवले आहे. हक्काच्या ग्रामपंचायतीत झालेला पराभव भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा ठरला आहे.
मालवण तालूका केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राणेंचा पराभव झाला असला तरी अनेक गावे आजही राणेंच्या पाठीशी ठामपणे उभी आहेत. यातीलच एक ग्रा. पं. म्हणजे कोळंब होय. १९९० मध्ये राणेंचे मालवणात आगमन झाल्यानंतर आजपर्यंत ३० वर्षे याठिकाणी राणेंच्या विचारांची सत्ता राहिली आहे. त्यामुळे यंदाच्या ग्रा. पं. निवडणुकीतही येथे भाजपचा सरपंच बसणार असा आत्मविश्वास राणे समर्थकांना होता. येथून भाजपाने भुवनेश्वरी नंदू कामतेकर यांना सरपंच पदाच्या रिंगणात उतरवले. तर शिवसेना ठाकरे गटाने सिया रामचंद्र धुरी या राजकारणाची एबीसीडी देखील माहित नसलेल्या नवोदीत उमेदवाराला संधी दिली. कोमल मानसिंग लाटकर या देखील सरपंच पदाच्या रिंगणात होत्या. प्रचारासाठी भाजपाकडे मातब्बर पदाधिकाऱ्यांचा भरणा होता. तर ठाकरे गटाकडे विजय नेमळेकर यांच्या सारख्या ज्येष्ठांचे पाठबळ होते. तरीही या ग्रा. पं. मध्ये भाजपचा झेंडा फडकणार असा विश्वास स्थानिक पदाधिकारी व्यक्त करताना दिसत होते. या ग्रा. पं. च्या प्रचारात भाजपने मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत असले तरी शिवसेना ठाकरे गटाच्या खेळीकडे केलेले दुर्लक्ष आणि अतिआत्मविश्वास याचा फटका भाजपला बसल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. मतदारांना गृहीत धरण्याची चुक केलेल्या भाजपला येथे फटका बसला असून सरपंच निवडणुकीत शिवसेनेच्या सिया धुरी यांनी ६२२ मते मिळवून विजय संपादन केला आहे. येथे भाजपच्या भुवनेश्वरी कामतेकर यांना ५१७ तर कोमल लाटकर यांना केवळ ४८ मते मिळाली.
ग्रा. पं. मध्ये देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाने पक्षाने आपले वर्चस्व राखले आहे. ग्रा. पं. च्या ९ पैकी ६ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये निकिता निलेश बागवे, नंदा बापू बावकर, विजय भिवा नेमळेकर, संजना संदीप शेलटकर, संपदा समीर प्रभू, स्वप्नील सखाराम परब समावेश आहे. या ठिकाणी भाजपचे मंगेश मधुकर चव्हाण, विशाल गुणाजी फणसेकर आणि उज्ज्वला चंद्रकांत करलकर हे निवडून आले आहेत. कोळंब सारख्या बालेकिल्ल्यात भाजपा पुरस्कृत उमेदवारांना स्वीकारावा लागलेला पराभव स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांसाठी आत्मचिंतन करायला लावणारा आहे.