मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेतील अत्याधुनिक साहित्यातील त्रुटी दूर

यतीन खोत, मंदार केणी यांचा पाठपुरावा ; साहित्य पुन्हा व्यायामशाळेत बसविण्याची कार्यवाही सुरु

मालवण : आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मालवण नगरपालिकेच्या व्यायाम शाळेत अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र या साहित्यात त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे साहित्य दुरुस्तीसाठी पाठवण्यात आले होते. या त्रुटी दूर करून हे साहित्य पुन्हा व्यायामशाळेत बसविण्यात आले आहे. माजी बांधकाम सभापती यतीन खोत आणि मंदार केणी यांनी यासाठी पाठपुरावा केला.

शहरातील व्यायामपटूंच्या मागणीनुसार आमदार वैभव नाईक यांनी पालिकेच्या व्यायामशाळेसाठी अत्याधुनिक व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून दिले होते. या साहित्याचे लोकार्पण करताना या साहित्यामध्ये काही त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्याने आमदार नाईक यांनी संबंधित ठेकेदाराला सर्व त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हे सर्व साहित्य त्रुटी दूर करण्यासाठी नेण्यात आले. या त्रुटी लवकरात लवकर दुर व्हाव्यात यासाठी माजी बांधकाम सभापती यतीन खोत, मंदार केणी यांनी विशेष पाठपुरावा केला. व्यायामशाळेतील साहित्य अचानक हलविण्यात आल्याने विरोधकांनीही याबाबत प्रशासनास जाब विचारला होता. यावर सत्ताधाऱ्यांनी हे साहित्य त्रुटी दूर करण्यासाठी पाठविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. अखेर त्रुटी दूर करत हे सर्व साहित्य व्यायामशाळेत बसविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!