प्राणघातक हल्ला प्रकरणी चार आरोपींच्या मुसक्या कणकवली पोलिसांनी आवळल्या…!

कराड जिल्ह्यातून आरोपींना घेतले ताब्यात ; उद्या न्यायालयात हजर करणार

कणकवली : कणकवली जानवली आदर्शनगर येथील शिवानंद दत्तात्रय जंगम यांच्यावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या प्रेमकुमार नलवडे याच्यासह त्याच्या अन्य तीनही साथीदारांच्या मुसक्या आवळण्यात कणकवली पोलिसांना यश आले आहे. या आरोपींना कराड जिल्ह्यातून ताब्यात घेऊन कणकवली पोलिसांचे पथक सोमवारी कणकवलीत दाखल झाले. पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली. ‘एक फुल दो माली’ या प्रेमसंबंधातील गैरसमजुतीने हा प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती उघड झाली आहे.

शुक्रवारी रात्री ९ वा.च्या सुमारास जानवली-आदर्शनगर येथील रचना कन्स्ट्रक्शनच्या दोन निवासी कॉम्प्लेक्स इमारतीतील मोकळया जागेत हा प्राणघातक हल्ला झाला होता. यावेळी झालेल्या आरडाओरडीचा आवाज ऐकून इमारतीतील लोक धावुन आल्यावर चारही आरोपींनी अंधाराचा फायदा घेत तिथून पळ काढला. या मारहाणीत काठीने शिवानंद जंगम याचे डोके फोडल्याने तो रक्तबंबाळ झाला होता. त्याला कॉम्प्लेक्समधील रहिवाशांनी रूग्णालयात हलविले. रूग्णालयात शिवानंद याने त्याचा चुलता सुनिल रामचंद्र जंगम यांना मारहाण करणाऱ्यामध्ये आपल्या एका मैत्रिणीचा मित्र प्रेमकुमार नलावडे अशी माहिती दिली होती. शिवानंद जंगम हा मारहाणीत जबर जखमी झाला होता. तो काही दिवस पोलिसांना जबाबही देऊ शकला नव्हता. हल्ला करून हल्लेखोर मुंबईला रवाना झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी काढली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक आहे त्या स्थितीत तातडीने मुंबईला रवाना झाले. मुंबईत गेल्यावर आरोपी कराडला गेल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिस पथकाने कराड गाठल्यावर आरोपींनी अनेकवेळा पोलिसांनी चकवा देण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी प्रसंगी काहीकाळ उसाच्या फडात धरून एकेका आरोपीला ताब्यात घेत चोख कामगिरी केली. या तपासात सायबर विभागाचे बळीराम सुतार यांनी मोठे सहकार्य केले. घटना घडल्यानंतर काहीवेळातच आरोपींच्या मागावर गेलेले पोलिस पथक सोमवारी सायंकाळी पावणे सहा वाजता कणकवलीत दाखल झाले.

पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकात पोलिस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे, पोलिस हवालदार पांडुरपांढरे, चालक मकरंद माने यांचा समावेश होता.

शिवानंद जंगम याचे एका मैत्रिणीशी सुर जुळून आले होते. अलिकडे तो तिच्या संपर्कातही नव्हता. दरम्यान ती मैत्रीण मुंबईला गेल्यावर प्रेमकुमार नलावडे याच्या संपर्कात आली. त्याची मैत्री जुळली. कालांतराने त्याला त्याच्या मैत्रीणीच्या पहिल्या मित्राची शिवानंदची गोष्ट कळली. त्या रागातून प्रेमकुमार नलावडे याने हा प्राणघातक हल्ला चढविला अशी माहिती शिवानंद याच्या जबाबातून पुढे आली आहे. याप्रकरणी अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक वृषाली बरगे अधिक तपास करीत आहेत. प्रेमकुमार नलवडे व त्याच्या तीन साथीदारांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. आरोपींची ओळख परेड झाल्यावर त्यांची नावे दिली जातील असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!