महिलेस मारहाण करून विनयभंग केल्या प्रकरणात दोघांना जिल्हा न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
मालवण दांडी येथील घटना ; संशयितांच्या वतीने ॲड. रुपेश परुळेकर व ॲड. अक्षय सामंत यांचा युक्तिवाद
मालवण | कुणाल मांजरेकर
मासे खरेदी विक्री व्यवसाय आणि कौटुंबिक मालमत्तेच्या वादविवादातून महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी तसेच तिच्या वडिलांना मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या दोघा संशयिताना मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. भारूका यांनी १५ हजाराचा वैयक्तिक जात मुचलक्यासह अटीशर्टींवर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. ही मारहाणीची घटना २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता दांडी आवार येथे घडली होती. दर्शन चंद्रकांत पालव (रा. पोईप) व रतन प्रभू पाचंगे (रा. आचरा) अशी संशयितांची नावे आहेत. संशयितांच्या वतीने ॲड. रुपेश परुळेकर व ॲड. अक्षय सामंत यांनी युक्तिवाद केला.
यातील ३० वर्षीय महिला फिर्यादी ह्या खासगी नोकरी निमित्त मुंबईला रहावयास आहेत. फिर्यादीचे वडील आणि शुभम जुवाटकर यांच्यात मासे खरेदी विक्री व्यवसाय आणि कौटुंबिक वादविवाद आहेत. २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता फिर्यादी या वडील यांनी सुकत घातलेले मासे गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. ७.३० वाजता त्या मासे गोळा करून परतत असताना आरोपी शुभम भिखाजी जुवाटकर, तमास फॅन्दलीस ब्रांगझा, दर्शन चंद्रकांत पालव, रतन प्रभू पाचंगे, राकेश राजकुमार सावंत यांनी तिच्या वडिलांसह तिला मारहाण करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले होते. याबाबतची तक्रार महिलेने मालवण पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर पोलिसांनी पाचही जणांवर भा. द. वी. कलम ३२६,३५४,३५४ अ(१)(४), ३५४ ब, ३२४,१४३,१४७,१४८,१४९,३२३,५०४,५०६,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. यातील आरोपी दर्शन चंद्रकांत पालव व रतन प्रभू पाचंगे यांनी मे. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्याची सुनावणी होऊन रक्कम रु. १५०००/- चा वैयक्तिक जातमुतलका, तपासकामात पोलिसांना सहकार्य करणे, साक्षीदारांवर दबाव न टाकणे या अटी शर्टींवर मा. जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. एस. जे. भारुका यांनी सोमवारी हा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.