मंगळसूत्र चोरटा कणकवली पोलिसांच्या ताब्यात ; दोन दिवसांची पोलीस कोठडी
कणकवली : फोंडाघाट बाजारपेठेतील दुकानदार महिलेला बोलण्यात गुंतवुन ठेवून तिच्या गळ्यातील ६० हजार किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हातचलाखीने लांबवून नेल्याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी कुडाळ न्यायालयाकडून ताब्यात घेऊन अटक केली आहे. हसन नासिर हुसेन उर्फ इरानी (४८, बिदर कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
फोंडाघाट बाजारपेठेतील दुकानदार महिलेचे सोन्याचे मंगळसुत्र हडप केल्याची घटना ९ सप्टेंबर रोजी घडली होती. तत्पूर्वी काही महिन्यापूर्वी कुडाळ पोलीस स्टेशन हद्दीत अशीच घटना घडली होती. आरोपी हसन नासीर हुसेन याला अशाच एका चोरी प्रकरणी रायगड पोलीसांनी अटक केली होती. त्यावेळी पोलीस तपासात जिल्ह्यातील चोरीचा छडा लागला होता. तेथील आरोपी न्यायालयीन कस्टडीत असताना कुडाळ व कणकवली पोलीसांनी न्यायालयाकडून आरोपीला दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. कुडाळ येथील पोलीस कोठडीची मुदत संपताच कणकवली पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
नेमकं काय आहे प्रकरण ?
घोणसरी-आयरेवाडी येथील सुमती अशोक एकावडे या महिलेचे फोंडाघाट बाजारपेठेत काचेच्या बांगड्यांचे दुकान आहे. ९ सप्टेंबर रोजी दुपारी ११.४५ सुमारास एक व्यक्ती त्या महिलेच्या दुकानात आली. त्या व्यक्तीने दोन डझन काचेच्या बांगड्या देण्याची मागणी केली. बांगड्याचे पेसै देतो असे सांगुन त्या व्यक्तीने त्या महिलेला विनंती केली. त्या बांगड्या तुमच्या सोन्याच्या दागिन्याला स्पर्शून देवीला अर्पण करा. आपल्या ज्वेलरीच्या दोन पेढ्या आहेत. त्या चालत नाही त्यासाठी हा उपाय करीत असल्याचे सांगितले. महिलेने तसे करण्यास नकार दिला. परंतू त्या व्यक्तीने बोलण्यात गुंतवून ठेवून चलाखीने मंगळसूत्र लांबविले होते.