निलेश राणे आश्वासक नेतृत्व ; पुढील पाच वर्ष सिंधुदुर्गसाठी सुवर्णकाळ ठरणार

माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांचा विश्वास : लाडकी बहीण योजना ठरणार माईलस्टोन                             

मालवण | कुणाल मांजरेकर

कुडाळ मालवण मतदार संघातील महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून मागील अडीच वर्षात कोट्यावधींचा निधीआणला आहे. त्यामुळे या निवडणुकीत ते आश्वासक नेतृत्व म्हणून उदयाला येत असून त्यांच्या रूपाने एक व्हिजन असलेले नेतुत्व आपल्याला मिळणार आहे. रस्ते, वीज, पाणी या दैनदिन कामाच्या पलीकडे जावून स्वछतेसाठी एक यंत्रणा कार्यान्वित करण्याचा त्यांचा मानस आहे. मतदार संघात कॅन्सर हॉस्पिटल, फ़ूड प्रोसेसिंग यूनिट, यूपीएससी, एमपीएससी मार्गदर्शन केंद्रे अश्या आरोग्य, शैक्षणिक, रोजगाराभिमुख योजना हा त्यांचा संकल्प आहे. त्यामुळे येणारा काळ सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुवर्णकाळ ठरणार आहे. त्यामुळे आपला हक्काचा आमदार म्हणून आपल्या मतदार संघाच्या शाश्वत विकासासाठी निलेश राणे याना मोठ्या मताधिक्याने विजयी करणे ही काळाची गरज आहे, अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

मागील तीन वर्ष मालवण नगरपरिषदेतील प्रशासकाच्या मनमानी कारभाराबाबत माजी नगराध्यक्ष म्हणून मालवणच्या विकास कामाबाबत, स्वच्छतेबाबत काम होत नसल्याचे जाहीर निवेदन करुनही त्याकडे आमदार वैभव नाईक व माजी खासदार विनायक राऊत यांनी दुर्लक्ष केले. यामुळे मालवणच्या विकास कामासाठी एक आश्वासक नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेनेत पुन्हा कार्यान्वित झालो. मी नगराध्यक्ष झालो तेव्हा माझा पक्ष शिवसेना होता. शिवसेना भाजप युती होती आणि चिन्ह पण धनुष्यबाण होत आणि आता पण तसच आहे. त्यामुळे मी माझ्या पक्षाशी प्रतारणा केली नाही.  आमचा लोकप्रतिनिधी कालावधी डिसेंबर २०२१ ला संपल्यानंतर प्रशासकीय कालावधी सुरु झाला.  देशातील राजकीय घडामोडीमुळे नगरपरिषद निवडणुका पुढे पुढे ढकलत गेल्या. आज मितीस सुमारे तीन वर्ष प्रशासकीय कारभार सुरू आहे. जी विकास कामे आमच्या कालावधीत सुरू झाली होती ती एका प्रशासकाच्या मनमानी कारभारामुळे अद्याप पूर्ण झाली नाहीत. यामध्ये सुसज्ज असे भाजी मार्केट, आपल्याच सफाई कर्मचारीसाठी, नगर परिषद आवारातील अग्निशमन बिल्डिग,  मामा वरेरकर या ठिकाणचा वातानुकूलित मल्टिपर्पज हॉल , अग्निशमन बिल्डिग अशी बरीच कामे अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाहीत. स्वच्छता ही फक्त इव्हेंटपूर्ती मर्यादित राहिली आहे. डास फवारणी बंद करण्यात आली आहे. दरवर्षी मे महिन्यात मालवण नगरपरिषदेच्या मालकीच्या सार्वजनिक विहिरींची पाण्याची पातळी कमी झाली की पाणी उपसा करून पाणी शुद्धीकरण केले जात होते ते पण सध्या बंद करण्यात आले आहे. लाखो रुपयांच्या कचऱ्यापासून खत निर्मितीच्या मशिन मागील दोन वर्षापासून बंद आहेत. स्वच्छतेच्या नावाखाली जवळपास ३० लाख किमतीचा जेसीबी आज गॅरेज मधे धूळ खात उभा आहे. अश्या प्रकारे मालवणच्या जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे. फोवकांडा पिंपळ या मध्यवर्ती ठिकाणी असलेला रंगीत कारंजा गेले दीड वर्ष बंद आहे. फिश मार्केट इमारत वरचा मजल्यावरील मच्छीमार बांधवाना गृहीत धरून बांधलेले गाळे आज भाडे ठरविले नसल्याने मागील अडीज वर्षापासून बंद पडून आहेत. 

मालवणची नळपाणी योजना, भुयारी गटार योजना होण्यासाठी आमच्या कालावधी सातत्याने प्रयत्न करत होतो. पण मागील अडीज वर्षामध्ये बिल काढण्यापलीकडे कुठलही काम झाल नाही. मालवण शहराच्या प्रलंबित विकासकामाबद्दल,  स्वच्छतेबद्दल, चुकीच्या धोरणामुळे होत असलेल्या आर्थिक नुकसानीबद्दल याअश्या अनेक बाबतीत मागील अडीज वर्ष सातत्याने आवाज उठवूनही  प्रशासकाने याबाबत कुठलीही बाब गांभीर्याने घेतली नाही.  आणि याबाबत त्यांना विद्यमान आमदार, खासदार यांच्या कडून हवी तशी समज देण्यात आली नाही. आमदार याना पण सातत्याने खोटी आश्वासन देण्यात आली.  अस असताना प्रशासका विरुद्ध आयुक्तांकडे तक्रार करणे आवश्यक असताना मवाळ धोरणाचा त्रास मालवणच्या जनतेला झाला. मालवण शहराची विकास कामे ठप्प झाली. नगरपालिकेचे लाखो रूपयाचे आर्थिक नुकसान झाले. शासकीय निधीचा अपव्यय झाला, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. ज्याला मालवणच्या विकासाबद्दल काही घेणंदेण नाही अश्या एका शासकीय अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे आपल्या शहराची वाट लागत असेल तर अश्यावेळी मवाळ धोरण नाही तर अश्या अधिकाऱ्यावर कारवाई ची धमक दाखविणाऱ्या लोकप्रतिनिधीची गरज आहे. आणि ते सर्व गुण कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्यामधे आहेत. एक उच्च शिक्षित परदेशात एमबीए केलेली व्यक्ती आज आपला लोकप्रतिनिधी म्हणून लाभणार आहे. मागील दहा वर्ष कुठलेही पद नसताना त्यानी कुडाळ मालवण मतदार संघात पक्षाच्या माध्यमातून कायम कार्यान्वित राहून कोट्यांनी रुपयाची विकास कामे केली आहेत. वास्तविक एका सधन कुटुंबातील असूनही पराभवाने खचून न जाता कायम जनतेच्या सेवेत कार्यरत राहिले. सिंधुदुर्गवासिय भाग्यवान आहेत कारण आज नारायण राणे साहेब हे केंद्रात खासदार आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीत देवगड मधून नितेश राणे,  मालवण कुडाळ मधून निलेश राणे आणि सावंतवाडीतून दीपक केसरकर हे तीन आमदार लाभणार आहेत. त्यामुळे येणारा काळ हा सिंधुदुर्ग वासियासाठी सुवर्णकाळ ठरणार आहे. केंद्रात महायूतीच सरकार आहे आणि आता राज्यातही महायुतीचच सरकार येणार आहे. त्यामुळे या दुग्धशर्करा योगाचा फायदा आपली विकास कामे करुन घेण्यासाठी होणार आहे. मागील अडीज वर्षात महायुती शासनाने कोट्यवधी रुपयाची विकास कामे केली आहेत. पण लोकांसाठी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, वृद्धांसाठी योजना, अपंगासाठी योजना, यासारख्या योजना आणुन हे सरकार जनतेचे आहे हे आश्वासित केले आहे, असे महेश कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3835

Leave a Reply

error: Content is protected !!