एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज सुकळवाड येथे ग्रंथपाल दिन साजरा

डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण 

मालवण | कुणाल मांजरेकर
ग्रंथालयांच्या विकासात डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा सिंहाचा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ. रंगनाथन यांची रूजवला. नंतर तो जोपासण्यासाठीही आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षण देखील किती आवश्यक असते, याचे महत्त्व डॉ.रंगनाथन यांनी ग्रंथालयाच्या माध्यमातून सर्वप्रथम पटवून दिले. ग्रंथालय ही एक सामाजिक संस्था असून समाजाच्या हितासाठी ग्रंथालयांचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या डीन एकेडमिक सौ. पूनम कदम यांनी येथे बोलताना केले.

ग्रंथालयाचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (एमआयटीएम) कॉलेजमध्ये राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. ज्येष्ठ शिक्षक विशाल कुशे यांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी मनोज खाडीलकर, सुकन्या सावंत, श्री. कुर्से, ग्रंथपाल सौ. अपर्णा मांजरेकर यांच्यासह महाविद्यालयाचे अन्य प्राध्यापक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी सौ. कदम म्हणाल्या, शिक्षण मिळविणे सोपे आहे, पण शिक्षण देणे हे एक शास्त्र आहे, हे लक्षात आल्यानंतर डॉ. रंगनाथन यांनी त्या शास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवून अध्यापन शास्त्राची ‘एल. टी.’परीक्षा उत्तीर्ण केली आणि गणिताचे प्राध्यापक झाले. नंतर त्यांनी आपली प्राध्यापकाची नोकरी सोडून भारताचे पहिले ग्रंथपाल पद स्वीकारले. त्यांनी मद्रास विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून काम पाहिले. ग्रंथालय शास्त्राच्या शिक्षणाकरिता मद्रास विद्यापीठाने आपल्या स्वखर्चाने त्यांना स्कूल ऑफ लायब्ररीयनशिप साठी लंडनला पाठविले होते. लंडन विद्यापीठाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते पुन्हा मायदेशी परतले. सार्वजनिक ग्रंथालयाची गरज ओळखून ३० जानेवारी १९२४ रोजी त्यांनी ‘मद्रास ग्रंथालय संघाची’ स्थापना केली, असे सौ. कदम म्हणाल्या. ग्रंथपाल सौ. अपर्णा मांजरेकर यांनी प्रास्ताविक करताना डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या बाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस म्हापसेकर यांनी केले. तर ग्रंथालय कर्मचारी सायली पाटकर यांनी आभार मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!