मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेतील अत्याधुनिक मशिनरीचे उद्या लोकार्पण : आ. वैभव नाईक यांची उपस्थिती
ऑलिंपिक दर्जाचे साहित्य दाखल ; युवकां बरोबरच युवतींसाठीही विशेष बॅच
मालवण : शहरातील ग्रामीण रुग्णालय मागील पालिकेच्या इमारतीतील व्यायामशाळेत २५ लाख रुपयांच्या निधीतून अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. या अत्याधुनिक व्यायाम साहित्य व मशिनरीचे लोकार्पण मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी दिली आहे.
व्यायामशाळा येथील साहित्य जीर्ण झाल्याने नवीन साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी येथील व्यायामपटू यांनी तत्कालीन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची भेट घेऊन नवीन व्यायामशाळा साहित्य उपलब्ध करण्याची मागणी केली होती. साहित्य उपलब्धतेसाठी शासन स्तरावरून निधी करून उपलब्ध करून देऊ असा शब्द नगराध्यक्ष यांनी दिला होता. दरम्यान कांदळगावकर यांच्यासह यतीन खोत, मंदार केणी व सहकारी नगरसेवक यांच्या माध्यमातून आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधण्यात आले. शासन स्तरावरून २५ लाख निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार आमदार वैभव नाईक यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला.
शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या उपलब्ध २५ लाख निधीतून अत्याधुनिक असे व्यायामशाळा साहित्य व मशीन व्यायामशाळा येथे उपलब्ध झाली आहेत. उपलब्ध झालेले अत्याधुनिक पद्धतीचे व्यायामशाळा साहित्य ऑलम्पिक स्तरावरील दर्जाचे आहे, याठिकाणी युवकां बरोबरच युवतींना देखील स्वतंत्र बॅच उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती व्यायामशाळा प्रशिक्षक प्रवीण हिंदळेकर यांनी दिली आहे.