रोटरी क्लब आयोजित समरगीत गायन स्पर्धेत टोपीवाला प्राथ. शाळा, रेकोबा हायस्कूल प्रथम
मालवण | कुणाल मांजरेकर
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रोटरी क्लब मालवणच्या वतीने येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात घेण्यात आलेल्या समरगीत गायन स्पर्धेत प्राथमिक गटात टोपीवाला प्राथमिक शाळा आणि माध्यमिक गटात रेकोबा हायस्कुलने प्रथम क्रमांक मिळवला. ही स्पर्धा डॉ. लिमये यांनी पुरस्कृत केली होती.
सदर स्पर्धा प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटांमध्ये घेण्यात आली. प्राथमिक गटामध्ये ५ तर माध्यमिक गटामध्ये ८ संघ सहभागी होते. स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सौ. उज्ज्वला सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. रतन पांगे, सचिव रो. अभय कदम, रो. डॉ. अजित लिमये, रो. रंजन तांबे, रो. महादेव पाटकर, रो. उमेश सांगोडकर, रो. सुहास ओरसकर, रो. संदेश पवार, रो. महेश काळसेकर, रो. संजय गावडे आदी उपस्थित होते. या स्पर्धेत प्राथमिक गटात भंडारी हायस्कुल आणि कन्याशाळा यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. प्राथमिक गटात अनुक्रमे तीन क्रमांकाना १०००₹ आणि चषक, ७००₹, ५००₹ बक्षीस देण्यात आले. माध्यमिक गटात वराडकर हायस्कूल आणि टोपीवाला हायस्कूलने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. माध्यमिक गटात अनुक्रमे तीन क्रमांकाना १५००₹ चषक, १०००₹, ७००₹ पारितोषिक देण्यात आले. ओझर हायस्कुलला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. सर्वोत्कृष्ट वादक म्हणून रेकोबा हायस्कूलचा रोख १०००₹ चे पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण संजय आठले आणि प्रफुल्ल रेवंडकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. महादेव पाटकर यांनी केले.