… नाहीतर “त्या” ८५० महिलांच्या कुटुंबासह मालवण नगरपालिकेवर मोर्चा आणणार ; शिवसेनेचा इशारा

माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांच्या नेतृत्वाखाली दीडशे महिलांची पालिकेला धडक

महिला बचत गटांना न्याय न मिळाल्यास शिवसेना स्टाईल दाखवू ; बबन शिंदे, हरी खोबरेकर यांचा इशारा

मालवण | कुणाल मांजरेकर

शासन एकीकडे महिला सक्षमीकरणावर भर देत असताना दुसरीकडे मालवण नगरपालिकेकडून महिला बचत गटांवर अन्याय केला जात आहे. नगरपालिका क्षेत्रात ८१ बचत गटांच्या सुमारे ८०० ते ८५० महिला सदस्य आहेत. मात्र या बचत गटांचे काम पाहण्यासाठी पालिकेने दोन ते तीन वर्षे समूह संघटक नेमलेला नाही. त्यामुळे महीला बचत गटांच्या सदस्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महिला बचत गटाच्या सुमारे १५० हुन अधिक सदस्यांनी बुधवारी माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेला धडक दिली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करून तातडीने समूह संघटकाची नियुक्ती करावी, अन्यथा बचत गटाच्या ८५० महिलांच्या कुटुंबासह मालवण नगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

मालवण नगरपालिकेमध्ये यापूर्वी महिला बचत गटांसाठी समूह संघटक नियुक्त करण्यात आला होता. मालवण शहरामध्ये सुमारे ८८ पेक्षा जास्त दारिद्र्यरेषेखालील बचत गट सध्या कार्यरत आहेत. शासन महिला आर्थिक सक्षमीकरण करणार असे एकीकडे सांगत असून दुसरीकडे मात्र महिलांवर नगरपरिषदेकडून अन्याय सुरू आहे. नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात सुमारे ८०० ते ८५० महिला बचत गट कार्यात आहेत. परंतु नगर परिषदेकडे या बचत गटांचे कामकाज पाहण्यासाठी दोन ते तीन वर्षे समूह संघटक या पदावर कोणताही अधिकारी नेमलेला नाही. त्यामुळे या बचत गटांचे भवितव्य अधांतरीत राहिलेले आहे. बचत गटांनी रोजगाराच्या दृष्टीने सादर केलेले बरेच प्रस्ताव आज नगर परिषदेकडे प्रलंबित आहेत. याकडे ढुंकूनही नगरपरिषद प्रशासन पहात नाही. दर महिन्यांची बचत जमा करून घेणे एवढेच काम बचत गटाचे राहिलेले आहे. तसेच मालवण नगर परिषदेत कायमस्वरूपी समूह संघटक पद नसल्याने बचत गटांना पर्यटनाच्या दृष्टीने महिलांना योग्य मार्गदर्शन, शासनाच्या योजना पोहोचत नाहीत. त्यामुळे त्याचा लाभ घेता येत नाही. बचत गटांना समन्वय करणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळाचाही करार सप्टेंबर नंतर संपणार असल्याने बचत गटांना कोणीच वाली राहणार नाही. त्यामुळे भविष्यात महिला बचत गटाच्या समस्या कोण सोडवणार, असा प्रश्न निर्माण होणार आहे. या प्रश्नाकडे शासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असेल तर बचत गटांचे महत्त्व कमी होऊन बचत गट बंद होण्यास वेळ लागणार नाही, अशी भावना यावेळी महिला बचत गटाच्या सदस्यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे लेखी स्वरूपात मांडली आहे.

या प्रश्नी माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी नगर परिषद प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. राजकीय पक्षांकडून महिला बचतगटांचा वापर फक्त राजकारणासाठी होत असल्याबाबत श्री. जावकर यांनी नाराजी व्यक्त केली. तर शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी समूह संघटकाची तातडीने नेमणूक करण्यासाठी आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून शासन स्तरावर आपण पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट करतानाच नगरपरिषद प्रशासनानेही प्रशासन पातळीवर याचा पाठपुरावा करावा, याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास शहर आणि तालुक्यातील महिला बचत गट सदस्यांसह शिवसेना नगरपालिकेवर मोर्चा आणेल, असा इशारा दिला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, दीपा शिंदे यांच्यासह संजना मांजरेकर, प्रतीक्षा गावडे दिपाली गोवेकर, प्रीती फर्नांडिस, कल्पिता जोशी, स्नेहा मयेकर, प्राची फाटक, संचिता मुणगेकर, अक्षता तावडे, साक्षी कोळगे, सरिता पांजरी, प्राजक्ता करलकर, शुभदा मुणगेकर, सिद्धी हळदणकर, जानवी जाधव, मानसी तांडेल, नीलम वेंगुर्लेकर, साक्षी नार्वेकर, भावना लोके, रोहिणी परब, उर्मिला जाधव, जयश्री मुंबरकर यांच्यासह अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!