मालवण शहरातील मच्छिमार्केट मध्ये होणार सुसज्ज प्रसाधनगृह
आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून २५ लाखांचा निधी प्राप्त
हरी खोबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमेय देसाई आणि शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण शहरातील मच्छीमार्केटमध्ये महिला मच्छी विक्रेत्यांच्या मागणीनुसार सुसज्ज प्रसाधनगृह बांधण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून या प्रसाधनगृहासाठी वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेतून २५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. या कामाच्या मंजुरीसाठी शिवसेना तालुकाप्रमुख तथा जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई आणि शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते.
मालवण शहरातील मच्छीमार्केट येथे सुसज्ज प्रसाधनगृहाची कमतरता जाणवत असल्याने येथील मच्छी विक्रेत्या महिलांसह अन्य नागरिकांची गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या मार्फत युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांच्यासह माजी नगरसेविका आकांशा शिरपुटे, सेजल परब, पंकज सादये, सन्मेष परब आदींनी आमदार वैभव नाईक यांच्या कडे मागणी केली होती. याची दखल घेत आमदार वैभव नाईक यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत या कामासाठी २५ लाख रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करून आणला आहे.