किल्ले सिंधुदुर्गचा उद्या ३५६ वा वर्धापन दिन ; प्रेरणोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम

महाराणी ताराबाईंचे इतिहासातील सिंधुदुर्ग किल्ल्यासाठीचे असे होते योगदान…

इतिहास अभ्यासक सौ. ज्योती तोरसकर यांचे होणार सविस्तर मार्गदर्शन

कुणाल मांजरेकर

मालवण : किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने उद्या (शनिवारी) किल्ले सिंधुदुर्गचा ३५६ वा वर्धापन दिन सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यावेळी महाराणी ताराबाई यांचे इतिहासात सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी योगदान काय, याबाबत इतिहास संशोधक सौ. ज्योती तोरसकर या सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने गेली १३ वर्षे सिंधुदुर्ग किल्ल्याचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. परंतू कोरोना काळात दुर्दैवाने २ वर्षे वर्धापन दिन साजरा करता आला नाही. यावर्षी शनिवार दि. १६ एप्रिल २०२२ रोजी किल्ला ३५६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या तिथीस प्रतीवर्षी प्रमाणे सकाळी ८ वाजता मोरयाच्या धोंडा येथील श्री मोरेश्वराची पुजा करुन प्रेरणोत्सवास सुरवात होणार आहे. यानंतर सकाळी ९.३० वाजता सिंधुदुर्ग किल्ल्यावरील श्री शिवराजेश्वर मंदिर येथे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस वंदन करुन त्यांना कोल्हापूर येथिल शिवप्रेमींतर्फे मर्दानी खेळांची सलामी दिली जाणार आहे. यावेळी मान्यवरांचे शिवस्तुतीपर विचार मांडले जाणार आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी इतिहास काळात महाराणी ताराबाई यांचे मोलाचे योगदान आहे. मात्र अद्यापही याबाबत आजची पिढी अनभिज्ञ आहे. या पार्श्वभूमीवर इतिहास संशोधक सौ. ज्योती तोरसकर या इतिहासाचा उलगडा करणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा शिवप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3842

Leave a Reply

error: Content is protected !!