शाखा अभियंता चौगले यांची सेवा सर्वोत्तम ; निवृत्ती निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव
जि. प. बांधकामचे शाखा अभियंता राजेंद्र चौगले ३५ वर्षांच्या सेवेतून निवृत्त
मालवण पं. स. सभागृहात रंगला सत्कार सोहळा ; सर्वपक्षीय नेत्यांसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित
कुणाल मांजरेकर
मालवण : आपल्या तत्पर आणि प्रामाणिक सेवेतून आदर्श निर्माण करणारे जिल्हा परिषद बांधकामचे शाखा अभियंता आर. जे. चौगले यांचा निवृत्तीपर सत्कार समारंभ गुरुवारी मालवण पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी राजे सभागृहात पार पडला. श्री. चौगले यांचे मालवण तालुक्याच्या विकासात बहुमोल असे योगदान आहे. जि. प. बांधकाम उपविभाग मालवण येथे शाखा अभियंता म्हणून त्यांनी बजावलेली सेवा सर्वोत्तम अशीच राहिली, असे कौतुकोद्गार व्यक्त करत उपस्थित मान्यवरांनी आर. जे. चौगले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
जि. प. बांधकाम उपविभाग मालवण येथील शाखा अभियंता राजेंद्र जंबु चौगले यांच्या सेवानिवृत्तीपर कार्यक्रमात त्यांच्या आदर्शवत कामाचे सर्वांनीच भरभरून कौतुक केले. यावेळी गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, माजी सभापती अजिंक्य पाताडे, माजी उपसभापती राजू परुळेकर, माजी जि. प. सदस्य हरी खोबरेकर, उपविभागीय अभियंता संतोष सावर्डेकर, गटशिक्षणाधिकारी संजय माने, माजी सदस्य सोनाली कोदे, अशोक बागवे, मधुरा चोपडेकर, निधी मुणगेकर, विनोद आळवे, श्री. कात्रे, हनुमंत प्रभू, भाऊ चव्हाण, सुरज बांगर, संजय गोसावी, मारुती सोनवडेकर यासह राजेंद्र चौगले यांच्या पत्नी, मुलगा, सून व नातू तसेच अधिकारी, कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारी अभियंता अनिल औटी व उपकार्यकारी अभियंता श्री. परुळेकर, माजी वित्त व बांधकाम सभावती संतोष साटविलकर, माजी सभापती धोंडी चिंदरकर, संतोष कोदे, संतोष गावकर यासह अन्य आजी माजी लोकप्रतिनिधी यांनीही उपस्थित राहून राजेंद्र चौगले यांना शुभेच्छा दिल्या.
निपाणी बेळगाव येथील शेतकरी कुटुंबातील राजेंद्र जंबु चौगले हे १९८६ साली मालवण येथे सेवेत हजर झाले. त्यानंतर वेंगुर्ला तालुक्यात १० वर्ष, सावंतवाडी तालुक्यात १० वर्षे सेवा बजावून ते पुन्हा मालवण कार्यालयात शाखा अभियंता म्हणून सेवा बजावून ३६ वर्षांनी ३१ मार्च २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी सर्वांनीच राजेंद्र चौगले यांचे भरभरून कौतुक केले. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी बजावलेल्या सेवेचा आदर्श नेहमीच सर्वांसमोर राहील, अशा कौतुक भावना सर्वांनी व्यक्त केल्या.
राजेंद्र चौगले यांचा मुलगा, सून यांनी कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या भावना तसेच त्यांच्या मुलीने जर्मनी येथून पाठवलेला शुभेच्छा संदेश सभागृहाला भावनिक करणारा ठरला. सर्व अधिकारी यांचे मार्गदर्शन, लोकप्रतिनिधी तसेच सहकारी कर्मचारी वर्गाचे सहकार्य व कुटुंबाची भक्कम साथ मिळाली. सर्वांचेच सहकार्य मिळाले. चांगले काम केले असेन तर याचे श्रेय या सर्वांचे आहे, अशा भावना राजेंद्र चौगले यांनी व्यक्त केल्या.