बाबा परब मित्रमंडळाची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा जिल्हयात “नंबर वन” ; निलेश राणेंचे गौरवोद्गार

राजकारणात चांगल्या दिवसांपेक्षा वाईट दिवस खूप पाहिलेत, वाईट दिवसांतही साथ न सोडणारा बाबा परब

मालवण मधील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेवेळी माजी खा. निलेश राणे यांनी व्यक्त केली भावना

कुणाल मांजरेकर

मालवण : राजकारणात मी चांगले दिवस किती बघितले ते माहीत नाही, पण वाईट दिवस नक्कीच खूप पाहिले आहेत. या वाईट दिवसात अनेक जण मला सोडून गेले. लहानपणीचा मित्र।मी निवडणूकीत हरल्याच्या दुसऱ्या दिवशी मला सोडून गेला. पण माझ्या वाईट दिवसांतही साथ न सोडणारी व्यक्ती म्हणजे बाबा परब ! म्हणूनच माझ्या आयुष्यात बाबा परब याची जागा महत्वाची आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी माझ्या पेक्षा जास्त कार्यक्रम बाबा परब घेतो. आजही एवढ्या भव्य दिव्य प्रमाणात बाबा परब मित्रमंडळाने मालवणात राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेची भव्यता पाहता ही क्रिकेट स्पर्धा जिल्ह्यात “नंबरवन” असल्याचे गौरवोद्गार भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी येथे बोलताना व्यक्त केले.

भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने येथील बोर्डिंग मैदानावर डे नाईट स्वरूपाची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला तीन लाख रुपये आणि आकर्षक निलेश राणे चषक तर उपविजेत्या संघाला दीड लाख रुपये आणि आकर्षक निलेश राणे चषक दिला जाणार आहे. या स्पर्धेला शुक्रवारी रात्री निलेश राणे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, विशाल परब, अतुल काळसेकर, धोंडू चिंदरकर, विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, महेन ढोलम, आनंद शिरवलकर, अजिंक्य पाताडे, विलास हडकर, राजू बिडये, अभय कदम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने निलेश राणे यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांची एकच आतिषबाजी करण्यात आली.

यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले, माझ्या वाढदिवसाला दरवर्षी बाबा परब मोठमोठे कार्यक्रम घेत असतो. अनेक वर्ष बाबा परब माझ्यासोबत काम करतोय एक भाऊ म्हणून तो नेहमी माझ्या सोबत राहीला असून मी निवडून आलो अगर निवडून आलो नाही याचाच त्याला कधीही फरक पडला नाही. जसा बाबा परब मला पहिल्या दिवशी भेटला, तसाच बाबा परब आजही आहे. त्याच्यामध्ये काहीही फरक पडलेला नाही. बाबा परब माझ्यासाठी काय आहे हे मी शब्दात सांगू शकणार नाही. मी राजकारणात चांगले दिवस किती पाहिलेत ते मला माहीत नाही, पण त्यापेक्षा जास्त वाईट दिवस पाहिले आहेत. अनेक मित्र सोडून जाताना मी पाहिलेत. माझा लहानपणीचा मित्र मी निवडणुकीत मी हरलो आणि दुसऱ्या दिवशी मला सोडून गेला असेही दिवस मी पाहिलेत.पण बाबा परब याने निलेश राणे जिंकला की हरला याची पर्वा कधीच केली नाही. तो सातत्याने कार्यक्रम घेत राहिला. समाजात असे कार्यक्रम उभे करायला फार कष्ट लागतात. एका दिवसात एवढा मोठा कार्यक्रम उभा रहात नाही. हे ग्राउंड बघितल्यावर याची प्रचिती येते. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना अशा प्रकारच्या भव्यदिव्य स्पर्धा आणि त्याचा खर्च पेलवण शक्य होत नाही, त्यामुळे जिल्ह्यातली एक नंबरची टूर्नामेंट बाबा परब मित्र मंडळाने आयोजित केली आहे, असे सांगून असेच मोठमोठे उपक्रम त्याच्या हातून होऊ देत. जिथे मी संपलो असं मला वाटत होतं, त्या ठिकाणी मला पुन्हा उभं करण्याचं काम बाबा परब या व्यक्तीने केलं आहे. म्हणून माझ्या जीवनात बाबा परब याला वेगळी किंमत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी निलेश राणे यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अजय शिंदे यांनी केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!