शासकीय कार्यालयात महिला लोकप्रतिनिधीचा “राडा” ; मालवणातील घटनेने खळबळ !
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू ; अधिकारी दहशतीखाली
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण शहरातील एका शासकीय कार्यालयात महिला लोकप्रतिनिधीने राडा केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यावेळी कार्यालय प्रमुखास धक्काबुक्की झाली असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेनंतर संबंधित विभागाचे अधिकारी दहशतीखाली आले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील एक महिला लोकप्रतिनिधी आपल्या मागण्यांसाठी एका शासकीय कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषणास बसली आहे. मंगळवारपासून आपली तब्येत बिघडल्याची तक्रार त्या महिलेने संबंधित कार्यालय प्रमुखाकडे केली होती. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबतची कल्पना घेऊन तपासणीसाठी पाचारण करण्यात आले. मात्र सायंकाळपर्यंत वैद्यकीय अधिकारी उपोषण स्थळी दाखल न झाल्याने या महिला लोकप्रतिनिधीचा पारा चढला. तीने थेट कार्यालयात जाऊन अद्याप पर्यंत डॉक्टर का आले नाहीत ? अशी विचारणा केली. यावर शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले असता खाजगी डॉक्टरला पाचारण केले नाही असा सवाल करत या महिला लोकप्रतिनिधीने शिवीगाळ करत या कार्यालयप्रमुखाला धक्काबुक्की केली. या घटनेनंतर संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. सायंकाळी उशिरा पर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.