शिक्षक समितीची विद्यार्थी विकासासाठीची चळवळ कौतुकास्पद
मालवण पं. स. सभापती अजिंक्य पाताडे यांचे प्रतिपादन
शिक्षक समितीच्यावतीने कुणकावळे येथे मालवण तालुकास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा शुभारंभ
मालवण : शिक्षक समिती केवळ शिक्षकांच्या हक्कासाठीच कार्यरत नसून ती विदयार्थी व समाजसाठीही योगदान देणारी संघटना आहे. शिक्षक समितीच्या माध्यमातून पंचायत समिती मालवणने सुद्धा अनेक शैक्षणिक उपक्रम साकार केले आहेत. कोरोना महामारी ओसरल्यानंतर शाळा सुरू झाल्या असताना प्रथमच जिल्हाभर शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजन करून शिक्षक समितीने सर्वांना आदर्शवत काम केले आहे. या चळवळीचे कौतुक करावे तेवढे थोडेच, असे प्रतिपादन मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्गच्या वतीने मालवण तालुकास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा उदघाटन सोहळा कुणकवळे शाळेत पार पडला. यावेळी उपसभापती सतीश उर्फ राजू परुळेकर, शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष नितीन कदम, तालुकाध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, शिक्षक नेते मंगेश कांबळी, परीक्षा प्रमुख विलास सरनाईक, संतोष नेरकर, कुणकवळे शाळेच्या मुख्याध्यापिका सावली सुर्वे, सहशिक्षक संजय जाधव, केंद्र परीक्षक मारुती चव्हाण, मंगेश मेस्त्री, स्वप्नाली शिंदे, दिव्यांका वाणी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपसभापती परुळेकर यांनी शिक्षक समिती राबवित असणारे उपक्रम हे सर्वांनाच मार्गदर्शक असतात. विधायक कामात समिती नेहमीच अग्रेसर आहे असे मत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांनी संघटनेने जिल्हाभर एकाच वेळी ही परीक्षा विद्यार्थ्यांना सोयीस्कर व्हावी म्हणून केंद्र पातळीवर आयोजित केली आहे. यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, शिक्षण सभापती अनिषा दळवी यांनी परवानगी दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. प्रशासनाने सुद्धा सहकार्य केले त्यामुळे परीक्षा सुरळीत होत आहे,असे सांगितले.
कार्यक्रमाचे उदघाटन दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी साळेल केंद्रातील परीक्षार्थी उपस्थित होते. सभापती पाताडे यांनी सीलबंद पेपर लखोटा उघडून परीक्षेला सुरुवात केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावली सुर्वे यांनी तर आभार तालुकाध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर यांनी मानले.