निलेश राणेंचं दातृत्व ; न. प. व्यायामशाळेच्या साहित्यासाठी दोन लाखांची आर्थिक मदत !

सत्ताधाऱ्यांकडून निधीच्या केवळ घोषणा ; पण निलेश राणेंनी स्वखर्चातून “करून दाखवलं” : व्यायामपटूंनी व्यक्त केली भावना

कुणाल मांजरेकर

मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्यातील दातृत्व पुन्हा एकदा दिसून आलं आहे. मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेतील व्यायामाचे साहित्य जीर्ण व नादुरुस्त झाल्याने साहित्य दुरुस्ती तसेच नवीन साहित्य खरेदीसाठी पालिकेकडून कार्यवाही होत नसल्याने निलेश राणे यांनी स्वखर्चातून या व्यायामशाळेसाठी २ लाख रुपयांची मदत केली. ज्येष्ठ उद्योजक डॉ. दीपक परब यांच्या हस्ते शुक्रवारी येथील भाजपा कार्यालयात ही मदत व्यायाम शाळा चालविणाऱ्या तरुणांकडे सुपूर्द करण्यात आली. आजपर्यंत आम्ही व्यायामशाळेसाठी पालिकेच्या सत्ताधाऱ्यांकडे, लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी केली. मात्र त्यांच्याकडून आश्वासनाखेरीज काहीच मिळाले नाही. सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी निधी मंजूर केल्याच्या कारणावरून आमच्याकडून स्वतःचे सत्कारही करून घेतले. परंतु निधी काही उपलब्ध झाला नाही. मात्र निलेश राणे यांना व्यायामशाळेच्या दुरावस्थेबाबत माहिती देताच त्यांनी तात्काळ स्वखर्चातून दोन लाख रुपये उपलब्ध करून दिल्याची भावना व्यायामशाळेतील तरुणांनी व्यक्त करत श्री. राणे यांचे यावेळी आभार मानले.

नगरपालिकेच्या ताब्यातील व्यायामशाळेची झालेली दुरावस्था आणि त्यामुळे व्यायामपट्टूचे होणारे हाल याबाबत माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी निलेश राणे यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार मालवण भाजप कार्यालय येथे व्यायामपटू यांच्याकडे ही दोन लाखांची रक्कम सुपूर्द करण्यात आली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, विलास हडकर, उद्योजक दीपक परब, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आप्पा लुडबे, ममता वराडकर, जगदीश गावकर, विजू केनवडेकर, मोहन वराडकर, विक्रांत नाईक, ललित चव्हाण, भाई मांजरेकर, राजू बिडये, पंकज पेडणेकर, निकीत वराडकर, सुबोध गावकर, सुनील बागवे यासह व्यायाम शाळेचे प्रवीण हिंदळेकर, स्वप्नील मालवणकर, प्रसाद माडये, प्रशांत पाटकर, जॉन फर्नांडिस, अवि आचरेकर आदी उपस्थित होते.

गेल्या दोन वर्षात मालवण नगरपालिकेची व्यायामशाळा कोरोना काळात बंद होती. तसेच त्याठिकाणी कोविड सेंटर सुरू केल्याने व्यायामशाळा बंद कालावधीत व्यायामाचे साहित्य गंज चढल्याने खराब झाले. हे साहित्य दुरुस्ती करून मिळावे तसेच काही साहित्य नव्याने खरेदी करावे अशी मागणी व्यायामशाळा चालविणाऱ्या तरुणांकडून नगरपालिका स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार वैभव नाईक यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र निधीची पत्र देण्यापलिकडे कार्यवाही झाली नाही. तीन महिन्यांपूर्वी या व्यायामशाळेसाठी ५ लाखाचा निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे व्यायामपटूंनी आमदारांचा सत्कार देखील केला. मात्र निधी काही उपलब्ध झाला नाही. खराब व अपुऱ्या साहित्यामुळे व्यायामशाळा चालविणे मुश्किल होत असल्याने व योग्य प्रकारे व्यायाम करणे शक्य नसल्याने येथील तरुणांनी निधीच्या मागणीसाठी भाजप नेते निलेश राणे यांचे लक्ष वेधले. निलेश राणे यांच्याकडे या तरुणांची व्यथा मांडली होती. त्यानुसार ही रक्कम व्यायामपटू यांना सुपूर्द करण्यात आली.

पालिकेवर भाजपची सत्ता आल्यावर व्यायामशाळेसाठी भरघोस निधी

जे काम नगरपालिका सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या आमदार, खासदार यांना जमले नाही ते काम निलेश राणे यांनी केले. या निधीमुळे व्यायामाचे साहित्य दुरुस्ती करणे सुलभ होणार आहे, असे सुदेश आचरेकर, विजय केनवडेकर यांनी सांगितले. येत्या मालवण नगरपालिका निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यावर व्यायामशाळेसाठी भरघोस असा निधी भाजप नेते निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाईल, असे आश्वासनही सुदेश आचरेकर यांनी यावेळी दिले.

निलेश राणेंचा “असाही” मोठेपणा !

भाजप नेते निलेश राणे शिवजयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने शनिवारी मालवण मध्ये येत आहेत. त्यामुळे व्यायामपटूंनी देण्यात येत असलेली रक्कम स्वतःच्या हातून देऊन स्वतःचा मोठेपणा करून घेण्याची संधी त्यांना होती. मात्र असे न करता निलेश राणेंनी अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ही मदत व्यायामपटूना सुपूर्द केली आहे, हाच निलेश राणे यांच्या मनाचा मोठेपणा असल्याचे सुदेश आचरेकर म्हणाले. तसेच ही मदत देताना व्यायामपटूंना त्यांनी कधीही “तुम्ही कोणत्या पक्षाचे काम करता ?” असा सवाल निलेश राणे यांनी केला नाही, असे विजय केनवडेकर म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!