ना. आदित्य ठाकरेंचा पुढाकार : सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार !
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत १ कोटी ६० लाख रुपये मंजूर : आ. वैभव नाईक यांची माहिती
कुणाल मांजरेकर
मालवण : येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग वरील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. यासाठी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेत प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून येथील पाणीपुरवठ्यासाठी १ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर सातत्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. पाण्याअभावी येथील गार्डन, शौचालयासाठी देखील पाणीपुरवठा उपलब्ध होत नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यावर पाणीपुरवठा करण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती. या मागणीला ना. ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. धामापूर नळपाणी योजनेवरून सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी पाणी पुरवठा करण्यात येणार असून यासाठी १ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच हे काम सुरू होईल, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. दरम्यान, मालवणच्या बंदर जेटीवर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या जागेत हा पुतळा उभा राहणार असून याबाबत नगरपालिकेला शासनाने योग्य त्या सूचना निर्गमित केल्याची माहिती देखील आ. नाईक यांनी दिली आहे.